हुशार विद्यार्थी कोणत्याही परीक्षेत सोपे प्रश्न आधी सोडवितो. त्याचप्रमाणे ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी गुरुवारी पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यात फिरून येथील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे म्हणून कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले. त्याआधी सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांनी सहकुटुंब सेंट जॉन शाळेतील मतदान केंद्रात मतदान केले. त्यानंतर स्वीय साहाय्यक आणि सुरक्षा रक्षकासह त्यांनी ठाणे शहरात विविध ठिकाणांना भेटी दिल्या. चारवेळा  नगरसेवकपद, त्यात एकदा सभागृह नेता, शहराचे महापौरपद आणि आता आमदार असणाऱ्या राजन विचारेंना ठाण्यातील शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी नावानिशी ओळखतो. त्यामुळे ‘सेंट जॉन’मध्ये मतदान केल्यानंतर त्यांनी वेळ न दवडता शिवसेनेचे नाक असलेल्या टेंभीनाक्यावरील ठाणे महापालिकेच्या ५ आणि ७ नंबरच्या शाळेतील मतदान केंद्रास भेट दिली. तिथे कार्यकर्त्यांबरोबरच भल्या पहाटे मतदान करण्यासाठी बाहेर पडलेल्या वृद्ध, अपंग तसेच महिलांकडून अभिवादन स्वीकारीत असतानाच मोबाइलवरून ठिकठिकाणच्या मतदानाची ते माहिती घेत होते.
एव्हाना नऊ वाजले होते आणि ठाणे शहरात बऱ्याच केंद्रांवर रांगा लावून नागरिक मतदान करीत असल्याच्या बातम्या मिळू लागल्या होत्या. तेवढय़ात ज्ञानसाधना महाविद्यालयातील केंद्रात मतदानाची प्रक्रिया बरीच कूर्मगतीने सुरू असल्याने नागरिकांना दोन तास खोळंबून राहावे लागत असल्याची माहिती एका कार्यकर्त्यांने दिली. त्यामुळे विचारेंनी आपला मोर्चा ज्ञानसाधनाकडे वळविला. चौकशी करता तिथे कर्मचारी कमी असल्याचे समजले. त्यामुळे तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना कळवून त्या केंद्रांवर दोन अतिरिक्त कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली. दहा-सव्वा दहाच्या सुमारास त्यांनी आपला मोर्चा वागळे इस्टेटकडे वळविला. वाटेत ठिकठिकाणी मतदार याद्या घेऊन बसलेल्या कार्यकर्त्यांशी धावता संवाद साधत जास्तीत जास्त मतदारांना बाहेर काढण्यासाठी प्रोत्साहित करीत होते. शिवाजीनगरमधील नगरसेवक संजय मोरे यांच्या संपर्क कार्यालयात काही मिनिटे विश्रांती घेऊन विचारे पुढे निघाले. एव्हाना उन्हाचा पारा चढला होता. तरीही वेळ थोडा असल्याने इंदिरानगर, सावरकरनगर वर्तकनगर, वसंत विहार, मानपाडा आदी परिसरातील कार्यकर्त्यांची त्यांनी धावती भेट घेतली. आवश्यक त्या ठिकाणी जादा कार्यकर्त्यांची कुमक पाठवून देण्याच्या सूचना ते शाखाप्रमुख तसेच विभागप्रमुखांना देत होते. मानपाडय़ापर्यंत ‘एकला चलो रे’ धोरणाने फिरणारे विचारे त्यानंतर मात्र काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन घोडबंदर परिसरातील मतदान केंद्रांची पाहणी करण्यास गेले…