महाराष्ट्रात सध्यातरी दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. त्याचा गांभीर्याने विचार करून तातडीने उपाययोजना करण्याची विनंती भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय कृषिमंत्री राधामाहेन सिंह यांना केली. महाराष्ट्रात केंद्रीय कृषी विद्यापीठ व काही जिल्ह्य़ांमध्ये कृषी विज्ञान केंद्राची स्थापना करण्यात यावी अशीही मागणी या शिष्टमंम्डळाने केली आहे. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, खा. हंसराज अहिर, खा. संजयकाका पाटील, आमदार जयकुमार रावळ, राम शिंदे, पाशा पटेल यांनी राधामोहन सिंह यांची भेट घेतली.
कृषी मंत्रालयात झालेल्या या बैठकीनंतर पत्रकाारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की,  जळगाव जिल्ह्य़ात केळीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात होते. त्यामुळे या जिल्ह्य़ात केळी संशोधन केंद्र व टिश्यू कल्चर प्रयोग शाळेची स्थापना होण्याची गरज आहे. याशिवाय यवतमाळ, सांगली, जळगाव, नागपूर व जालना जिल्ह्य़ात अतिरिक्त कृषी विज्ञान केंद्रांना मंजूर देण्यात यावी. याशिवाय लघू बीज प्रसंस्करण केंद्र, माती व जल परिक्षण केंद्र आदी विकसित केले जावेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशादायी चित्र निर्माण होईल. माती परिक्षणासाठी मोबईल लॅब, कृषी विद्यापीठांची सक्रियता, कृषी क्षेत्राशी संबधित परराष्ट्र धोरणात एकसंघता आदी मागण्या केल्या. राष्ट्रीयकृत बँकांमधून शेतकऱ्यांना कर्ज मिळणे दूरापास्त झाले आहे. कर्ज प्रक्रियेचे सुलभीकरण करण्याची गरज असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या सर्व मागण्यांना कृषिमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे फडणवीस म्हणाले.