पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांच्या नावाची अधिकृत घोषणा व्हायला अवघ्या दोन दिवसांचा अवधी असताना दिल्लीत हालचालींना उत आला आहे. नरेंद्र मोदी ‘गुजरात भवन’मध्ये उतरले असल्याने सत्तेचे ते तात्पुरते मुख्यालय बनले आहे. मोदी यांनी रविवारी दुपारी लालकृष्ण अडवाणी यांची त्यांच्या निवासस्थान भेट घेतली तर मोदींच्या भेटीसाठी देशभरातल्या प्रमुख नेत्यांनी ‘गुजरात भवन’चा उंबरठा झिजवला. पडद्याआडच्या हालचालीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघही सक्रिय असला तरी नव्या सरकारवर आमचा कोणताही अंकुश नसेल, असा अधिकृत पवित्रा संघाने घेतला आहे.
पंतप्रधानपदासाठी मोदी यांचे नाव जाहीर करण्यास लालकृष्ण अडवाणी यांनी सर्वप्रथम विरोध दर्शविला होता. संघाने ठाम पवित्रा घेतल्यानंतर अडवाणी नरमले तरी निवडणुकीत मोदी यांनी अभूतपूर्व विजय मिळवल्यावरही त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी लपली नव्हती.  दिल्लीत संसदीय पक्षाच्या शनिवारी झालेल्या बैठकीतही त्यांची देहबोली ही नाराजीच व्यक्त करणारी होती. त्यामुळे रविवारी दुपारी मोदी यांनी अचानक त्यांच्या घरी भेट दिल्याने प्रसिद्धी माध्यमांचीही लगबग उडाली. माध्यमांसमोर अडवाणी अधिक मनमोकळेपणे हास्य करीत मोदींशी संवाद साधताना दिसत होते.
या भेटीत प्रत्यक्ष बोलणे काय झाले, याचा तपशील जाहीर झाला नसला तरी नव्या सरकारमध्ये अडवाणींची काय भूमिका असेल, याबाबत मोदी यांनी चर्चा केल्याचे समजते. अडवाणी यांना लोकसभेचे सभापतीपद दिले जाण्याची चर्चा आहे.
संघाचा रिमोट कंट्रोल नाही
केंद्रातील भाजप सरकारला कधी गरज पडली तर आम्ही जरूर सल्ला देऊ पण कोणत्याही प्रकारे आम्ही अंकुश ठेवणार नाही की पक्ष आणि सरकारच्या कारभारात हस्तक्षेपही करणार नाही, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रविवारी स्पष्ट केले. संघाचे राष्ट्रीय प्रवक्ते राम माधव यांनी सांगितले की, सरकारच्या कामकाजात संघ कधीही रिमोट कंट्रोल म्हणून काम करीत नाही. संघाचे तत्त्वज्ञान काय आहे आणि ते पुढे नेण्यासाठी काय केले पाहिजे हे सर्व लोकप्रतिनिधींना माहीत आहे. मोदी यांना निवडून आणण्याचे श्रेय आमचे नाही. मात्र मतदानात वाढ होण्यामागे आमची मोहीम कारणीभूत आहे. आमच्या मोहिमेमुळे मतदानात दहा टक्के वाढ झाली आहे, असा दावा त्यांनी केला.