भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी लोकसभेसाठी बडोद्यापाठोपाठ वाराणसीतून गुरुवारी उमेदवारी अर्ज भरला पण त्या निमित्ताने झालेल्या भव्य शक्तिप्रदर्शनाने राजकीय क्षितिजावर पुन्हा वादंग उफाळले. अर्ज भरण्यासाठी तीन किलोमीटरचे मार्गक्रमण मोदींनी खुल्या ट्रकमधून केले तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा आणि इमारती, घरांच्या खिडक्या, गच्च्या आणि झाडांवरही तोबा गर्दी उसळली होती. या ‘यात्रे’त मोदींचे दोन लाख ‘भाविक’ सहभागी झाले होते.
मोदींचा सर्व कार्यक्रम मिनिटागणीक आखीवरेखीव बेतलेला. गुरुवार मात्र त्यासाठी अपवादात्मक ठरला. अर्ज भरण्यासाठी ते  हेलिकॉप्टरने उतरले ते बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या आवारात. तेथे त्यांनी पं. मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्यास पुष्पहार घातला. त्यानंतर या ‘यात्रे’त त्यांनी सरदार पटेल, स्वामी विवेकानंद आणि डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यांनाही पुष्पहार घातले. मुस्लीमबहुल नदेसर भागांतील जनताही स्वागतासाठी रस्त्यावर आली होती. तेथील विणकरांचे प्रश्न सोडवून त्यांना अद्ययावत तंत्राची जोड देऊन चीनच्या तोडीचे उत्पादन साधणार आहोत, असे मोदी म्हणाले. मी स्वत:हून आलेलो नाही तर गंगामातेनेच मला बोलावले आहे, अशी भावनिक पेरणीही त्यांनी केली. ही गर्दी जिल्हाधिकारी कार्यालयापाशी आली तेव्हा मात्र मोदी यांना २० मिनिटे ताटकळावे लागले! मोदींआधी एक ‘अपक्ष’ उमेदवार अर्ज भरत होता आणि त्यामुळे हा जथा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर थबकला होता.
११ राज्यांत निवडणूक सुरू असताना मोदी यांनी जाणीवपूर्वक हा मुहूर्त निवडला असून त्यांच्या ‘रोड शो’चे सर्व वाहिन्यांवरून झालेले थेट प्रक्षेपण हा आचारसंहितेचा भंग आहे, अशी तक्रार काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. मोदींसाठी उसळलेली आजची गर्दी म्हणजे मोदी लाट नव्हे तर सुनामीच आहे, असे वक्तव्य अमित शहा यांनी केले होते. त्यावरही काँग्रेसने टोला हाणला. सुनामी ही भीषण भविष्याचाच संकेत असते त्यामुळे शहा यांचे विधान खरेच आहे, असे काँग्रेसने सांगितले.
मोदींची मालमत्ता १४ लाखांनी वाढली
नरेंद्र मोदी यांची मालमत्ता आता एक कोटी ६५ लाख रुपये असून बडोदा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यावेळेपेक्षा त्यांच्या मालमत्तेत आता १४.३४ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. मोदी यांच्यासाठी सदर निधी पक्षाकडून देण्यात आल्याचे भाजपने म्हटले आहे.
बँक खात्यातील रकमेत झालेली वाढ आणि हाती असलेल्या रोख रकमेमुळे मोदी यांच्या मालमत्तेत वाढ झाल्याचे सांगण्यात आले.  मोदी यांच्या निवडणूक खात्यास रक्कम वळविण्यात येत असल्यामुळे त्यांच्या मालमत्तेत वाढ झाल्याचे दिसत आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते व पक्षाच्या कायदा विभागाचे निमंत्रक काकुभाई यांनी सांगितले. सदर निधी बँकेच्या ‘आरटीजीएस’ पद्धतीने वळविण्यात आल्यामुळे त्यामध्ये पारदर्शकता असल्याचा दावा काकुभाई यांनी केला.