मिझोरम आणि मेघालय या दोन राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण तीन जागा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसशी फारकत घेत स्वत:चा पक्ष स्थापन करणाऱ्या पी ए संगमांना कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्याची करामत करावी लागणार आहे. तर मिझोरमची एकमेव जागा टिकवण्याची कसरत काँग्रेसला करावी लागणार आहे. स्वतंत्र बोरोलँडचा मुद्दा तसेच त्रिपुरातल्या ब्रू नागरिकांना पोस्टाद्वारे मतदान करण्यास दिलेली परवानगी, यामुळे दोन्ही राज्यांमधील  वातावरण चांगलेच तापले आहे.
एकमेव लोकसभा मतदारसंघ असलेल्या मिझोरमधील जागेसाठी ९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सुमारे सात लाख मतदार या मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सी एल रुआला हे विद्यमान खासदार आहेत. लुआला यांच्याविरोधात या वेळी आठ विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या युनायटेड डेमोक्रेटिक पार्टी (यूडीएफ)चे उमेदवार रॉबर्ट रामोविया रॉएट आणि आम आदमी पक्षाचे मायकेल लालमांझुआला हे िरगणात आहेत. त्यामुळे त्यांच्या विजयाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र असे असले तरी यूडीएफच्या वतीने  िरगणात उतरलेल्या रॉएट यांना आठ राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे भाजपसह मेघालयमध्ये काँग्रेसला साथ देणाऱ्या राष्ट्रवादीने येथे मात्र यूडीएफमध्ये सहभागी होत रॉएट यांच्यामागे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. व्यवसायाने शिक्षक असणाऱ्या रॉएट यांनी राज्यातील शिक्षण क्षेत्रात चांगले काम केले आहे. यूडीएफने केंद्रात एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय आम आदमी पक्षाच्या मायकेल लालमांझुआला हेदेखील तरुण मतदारांना आपल्याकडे आकर्षति करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अनुभवी असणाऱ्या रुआला यांना बरीच मेहनत करावी लागणार असून मिझोरमधील लढत ही रंगतदार होणार आहे.
मिझोरम लोकसभा मतदारसंघातील ११२६ मतदान केंद्रांपकी ४० संवेदनशील आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मतदानाच्या काळात पोलिसांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

वादाचा मुद्दा
मिझोरमच्या एकमेव जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीत त्रिपुरातील मदत छावण्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पोस्टाद्वारे मतदान करू देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्यामुळे स्थानिक जनतेमध्ये नाराजीची भावना पसरली आहे. राज्यातील वांशिक िहसाचारानंतर बेघर झालेले सुमारे ३६ हजार नागरिक १९९७ पासून त्रिपुरातील सात मदत छावण्यांमध्ये वास्तव्य करीत आहेत. त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मिझोरम ब्रु डिस्प्लेस्ड पीपल्स फोरम ने आयोगाला साकडे घातले होते. त्यानंतर आयोगाने पोस्टाद्वारे मतदान करण्याची अनुमती दिली आहे. आयोगाच्या निर्णयाविरोधात येथील तरुण रस्त्यावर उतरला आहे.