लोकसभा निवडणुकीत २५ ते ३० जागा जिंकून नंतरच्या समीकरणांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची महत्त्वाकांक्षा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता आणि बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती बाळगून आहेत. त्या दृष्टीने त्यांच्या समर्थकांनी  वातावरणनिर्मिती सुरू केली आहे.

अण्णा द्रमुकच्या एका मंत्र्याने पक्षाच्या बैठकीत डॉ. जे. जयललिता पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार असल्याचे सुचवले, त्यानंतर अम्मांसाठी त्यांच्या समर्थकांनी मोर्चेबांधणीही सुरू केली. जयललितांनीही सावधपणे पावले टाकत भाजप आणि काँग्रेसपासून समान अंतर ठेवून वाटचाल सुरू केली. मोदींना भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केल्यावर त्यांचे अभिनंदन करण्याचे टाळून मुत्सद्दीपणा दाखवून दिला. उघडपणे जयललिता आपल्या पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षेबद्दल काहीच बोलत नाहीत, मात्र २४ फेब्रुवारीला त्यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त जोरदार वातावरणनिर्मिती करण्यात आली. सध्या जयललितांसाठी काहीशी अनुकूल स्थिती आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकमध्ये अनागोंदी आहे. त्यामुळे तामिळनाडूतील ३९ आणि पाँडेचरीमधील १ अशा चाळीस जागांपैकी किमान ३६ जागा जिंकण्याचा प्रयत्न आहे. बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात जर दोषी आढळल्या तर त्या अपात्र ठरू शकतात, हाच धोका आहे. कदाचित लोकसभा निवडणुकीनंतर त्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतही जाऊ शकतात असे म्हटले जाते.
१८ जागा- १९९८ मध्ये सर्वोत्तम कामगिरी

दिल्लीत सरकार कुणाचे असेल हे तृणमूल काँग्रेस ठरवील, असे ममता बॅनर्जी यांच्याकडून वारंवार सांगितले जात आहे. त्यातच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि दिल्लीच्या जामा मशिदीच्या शाही इमामांनी ममतांच्या साधेपणाबद्दल आणि धर्मनिरपेक्षतेबद्दल प्रमाणपत्र बहाल केले. आर्थिक मदतीबाबत केंद्राकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा मुद्दा तृणमूलने केंद्रस्थानी आणला आहे.  एके काळच्या डाव्या पक्षांच्या गडाला खिंडार पाडणाऱ्या तृणमूलचा ४२ पैकी ३० जागा पटकावण्याचा निर्धार आहे. सध्या तृणमूलचे १९ खासदार आहेत. तृणमूल काँग्रेस भाजपबरोबर जाईल काय याची चर्चा सुरू असते, विरोधकही हा मुद्दा उपस्थित करतात. ममतांनी यापूर्वी भाजपची आघाडी केली आहे. त्यामुळे भाजप आमच्यासाठी अस्पृश्य नाही असे तृणमूलच्या एका खासदाराने स्पष्ट केले. बंगालमध्ये जरी ३० टक्के मुस्लीम मतदार असले तरी दीदी अनपेक्षितपणे काहीही करू शकतात, असे एका खासदाराने स्पष्ट केले. दिल्लीतील नव्या सरकारने तीन ते चार वर्षे बंगालच्या कर्जाचा परतावा घेऊ नये अशी ममतांनी मागणी केली आहे. राजनाथ सिंह यांनी या मागणीला जाहीर सभेत अनुकूल प्रतिसाद दिला होता.
१९ जागा – २००९ मध्येजिंकल्या

बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा कधीच लपवून ठेवलेली नाही. उत्तर प्रदेशातील ८० पैकी किमान २५ च्या आसपास जागा जिंकून आपले महत्त्व वाढवण्याची त्यांची रणनीती आहे. विविध सर्वेक्षणांमधून तेवढय़ा जागा त्यांना मिळतील अशी शक्यताही आहे. त्यातच मुजफ्फर दंगलीनंतर राज्य सरकारने ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली त्यामुळे सत्तारूढ समाजवादी पक्षाबाबत नाराजी आहे. मायावतींच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त लखनौत राष्ट्रीय सावधान रॅलीत १० लाख कार्यकर्ते आले होते. आमच्या पाठिंब्याशिवाय दिल्लीत कुणीही सरकार स्थापन करू शकणार नाही, असा मायावतींचा दावा आहे. गेल्या वर्षी मेमध्येच ब्राह्मण संमेलन आयोजित करून मायावतींनी प्रचाराचा धडाका लावला. मुस्लीम आणि दलितांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. १८ मुस्लिमांना उमेदवारी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. मायावतींनी वेळोवेळी भाजप आणि मोदींना लक्ष्य केले आहे. मात्र मायावती ऐन वेळी काय निर्णय घेतील याचा अंदाज बांधणे कठीण आहे. आपल्या अटींवरच मायावती पुढची गणिते ठरवतील हे उघड आहे.
२१ जागा – २००९ मध्ये विजय