भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी समारंभाला श्रीलंकेचे अध्यक्ष राजपक्षे यांची उपस्थिती टाळावी यासाठी अनेक तामिळी नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. एनडीएचा घटक पक्ष असलेल्या एमडीएमकेने तीव्र विरोध दर्शविला आहे. राजपक्षे यांना निमंत्रित करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे आवाहन एमडीएमकेचे नेते वायको यांनी मोदी आणि भाजपच्या अन्य ज्येष्ठ नेत्यांना
केले आहे.
भाजपचे नेते अरुण जेटली आणि अमित शहा यांच्या उपस्थितीत वायको यांनी मोदी यांची भेट घेतली. राजपक्षे हे तामिळी जनतेचे कसाई आहेत. त्यामुळे त्यांना निमंत्रण देण्याचा फेरविचार करावा, असे वायको यांनी म्हटले आहे. मात्र मोदी यांच्याकडून आपल्याला कोणतेही आश्वासन मिळाले नसल्याचे वायको यांनी वार्ताहरांना सूचित केले.राजपक्षे यांची उपस्थिती टाळावी, अशी मागणी वायको यांनी भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंग यांच्याकडेही केली आहे. राजपक्षे यांच्या उपस्थितीबाबतच्या प्रश्नावर मोदी यांच्याशी चर्चा करावी, असेही वायको यांनी राजनाथसिंग यांना कळविले आहे.
‘राजपक्षेंना निमंत्रण देणे स्वीकारार्ह नाही’
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीला राजपक्षे यांना निमंत्रण देणे ही बाब जगभरातील तामिळी जनतेला अस्वीकारार्ह आहे, असे द्रमुकचे नेते एम. करुणानिधी यांनी म्हटले आहे. ज्या व्यक्तीने लक्षावधी तामिळींची हत्या केली अशा व्यक्तीला शपथविधी समारंभासाठी निमंत्रित करणे कितपत सयुक्तिक आहे याचा विचार करावा आणि त्यांना निमंत्रण देण्याची कल्पना रद्द करावी, असे करुणानिधी यांनी स्पष्ट केले.