तृणमूल काँग्रेसचे खासदार तपस पाल यांनी विरोधी माकप कार्यकर्त्यांना ठार करण्याची तसेच त्यांच्या महिला कार्यकर्त्यांवर बलात्कार करण्याची धमकी देत असंवेदनशीलताच दाखवून दिली. लोकसभा अध्यक्षांनी या वक्तव्याची दखल घेऊन पाल यांना अपात्र ठरवावे, अशी मागणी माकपने केली आहे.
नादिया जिल्ह्य़ातील चौमुहा गावात पाल यांनी ही मुक्ताफळे उधळली आहेत. काही स्थानिक वृत्तवाहिन्यांवर हे दाखवल्यावर खळबळ उडाली आहे. तृणमूल काँग्रेसच्या कोणा कार्यकर्त्यांला हात लावाल तर खबरदार, अशी भाषा या खासदारांनी वापरली आहे. मी कोलकात्याचा नाही, माझ्यापेक्षा शहाणे होण्याचा प्रयत्न करू नका. येथे जर कोणी माकपचा असेल तर त्याने ऐकावे, अशी वक्तव्ये या खासदारांनी केली आहेत. मी चंदननगरचा आहे. कार्यकर्ते हेच नेते घडवतात. मीपण गुंड आहे. तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाला तर मी गोळ्या झाडीन. तुमच्या जर हिंमत असेल तर मला रोखा, अशी आव्हानात्मक भाषाही त्यांनी वापरली आहे. यापूर्वी अनेक वेळा तुम्ही मला रोखले आहे.
 तृणमूलच्या आया-बहिणींचा अवमान कराल तर तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकीच दिली आहे. माझे कार्यकर्ते तुमच्या घरात येतील व ते बलात्कार करतील, असे वक्तव्य करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. मी तुम्हाला धडा शिकवीन, असे पुन:पुन्हा वक्तव्य केले आहे. बलात्काराची भाषा केली नसल्याचा दावा पाल यांनी केला आहे. मी छापा घालण्यास माझ्या कार्यकर्त्यांना सांगेन इतकेच वक्तव्य केल्याचा दावा पाल यांनी केला आहे.
तृणमूल काँग्रेसनेही पाल यांना फटकारले आहे. पक्ष अशा असंवेदनशील वक्तव्याचे समर्थन करणार नाही, असे प्रवक्ते डेरेक ओ ब्रायन यांनी स्पष्ट केले आहे. त्यांचे हे वक्तव्य मे महिन्यातील असल्याचे ब्रायन यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या इतर नेत्यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

लोकसभा अध्यक्षांनी स्वत:हून दखल घेऊन पाल यांना अपात्र ठरवावे, अशी मागणी माकप नेत्या वृंदा करात यांनी केली आहे, तर हे वक्तव्य पाहता पश्चिम बंगालमध्ये कायद्याचे राज्य नसल्याचे उघड होते, असे माकप नेते मोहम्मद सलीम यांनी सांगितले, तर खासदाराला अटक करावी, अशी मागणी किरण बेदी यांनी केली आहे.