लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेसशी कोणत्याही प्रकारचा निवडणूक समझोता करण्याची शक्यता तेलंगण राष्ट्र समितीचे (टीआरएस) नेते के. चंद्रशेखर राव यांनी शनिवारी येथे सपशेल फेटाळून लावली.
टीआरएसच्या नेत्यांनी आपला विश्वासघात केला, असे काँग्रेसच्या वतीने म्हटले जाईल, मात्र काय विश्वासघात केला, असा सवाल चंद्रशेखर यांनी केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंग यांनी, तेलंगणच्या निर्मितीनंतर टीआरएसने काँग्रेसमध्ये विलीन होण्यास नकार दिल्याने काही शेरेबाजी केली होती, त्याबाबत चंद्रशेखर यांनी सवाल केला
आहे.
तेलंगणला राज्याचा दर्जा मिळावा आणि शेकडो युवक करीत असलेल्या आत्महत्या टळाव्या यासाठी आपण टीआरएस काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र आता काँग्रेस पक्षात विलीन होण्यास जनतेचा विरोध असून आम्ही जनमताचा आदर करणार, असे चंद्रशेखर यांनी स्पष्ट केले.
तेलंगण राज्याच्या निर्मितीसाठी अनेकांनी आत्महत्या केली. त्याबद्दल काँग्रेसला जबाबदार धरले जात आहे. आता ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्याचे नाटक काँग्रेस करीत आहे. टीआरएसचे आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत की, त्यापासून माघार घेत आहेत ते रविवारपासून पाहावयास मिळेलच, असेही चंद्रशेखर म्हणाले.
काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेत तेलंगणमध्ये स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. तेलंगण राष्ट्र समितीसमवेत युतीचा किंवा विलीनीकरणाचा प्रस्ताव ठेवलाच नव्हता, असे प्रदेशाध्यक्ष पोन्नल्ला लक्ष्मणय्या यांनी सांगितले. तेलंगणमध्ये लोकसभेच्या १७, तर विधानसभेच्या ११९ जागा आहेत.