रामदास आठवले यांच्या रिपाइंचा महायुतीत समावेश होण्यापूर्वी लोकसभा निवडणुकीत मनसेशी हातमिळवणी करण्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र लोकसभेसाठी केवळ भाजपच्या कोटय़ातील जागा मनसेला द्यावात, अशी ‘जाचक’ अट त्यांनी मांडल्यामुळे भाजपला स्वत:च्या इच्छेवर पांघरुण घालावे लागल्याचे विश्वसनीय सूत्रांनी म्हटले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर ‘राज-उद्धव’ दिलजमाईसाठी भाजप नेत्यांचे प्रयत्न सुरू होते. त्यावेळी भाजपच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची घोषणा झाली नव्हती. रिपाइंपेक्षा मनसेचे ‘उपद्रवमूल्य’ जास्त असल्याने राज ठाकरे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केला होता. उद्धव ठाकरे यांनी काहीशी अनुकूलता दर्शविल्यानंतर भाजपने मनसेशी बोलणी सुरू केली होती. मात्र जागावाटपावर एकमत न झाल्याने ही चर्चेची गाडी पुढे सरकलीच नाही. त्यानंतर शिवसेनेने रामदास आठवले यांना महायुतीत आणले. परंतु आठवलेंना राज्यसभेवर पाठवून भाजपने शिवसेनेला तोंडघशी पाडले. स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्यासह रासपचे महादेव जानकर यांनादेखील भाजपने महायुतीत आणून शिवसेनेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत शिवसेनेचे दोन खासदार विरोधी पक्षांच्या गळाला लागले आहेत.  या पाश्र्वभूमीवर राज ठाकरे यांना सोबत घेतल्यास विधानसभा निवडणुकीत लाभ होईल, असा भाजप नेत्यांना विश्वास आहे. त्यामुळे शिवसेनेला खिजवण्यासाठी भाजप नेत्यांनी ‘राज’मार्ग निवडला. लोकसभा निवडणुकीत मनसे न उतरल्यास युतीला फायदा होईल, हे माहित असल्यानेच भाजपचे मनसेला जवळ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.