मुंबईला जागतिक दर्जाचे स्वरुप प्रप्त करून देण्याबरोबरच मुंबईची वाहतूक व्यवस्था सोडविण्याला आपले प्राधान्य राहिल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सांगितले. मुंबईचील रेसकोर्स येथे जागतिक दर्जाचे उद्यान उभारण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. हे उद्यान पाहण्यासाठी केवळ देशातूनच नव्हे तर जगभरातून लोक येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 शिवसेनाभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मुंबईच्या विकासाचे चित्र उद्धव यांनी मांडले. गोराई ते नरिमन पॉइंट या सागरी किनारा मार्गाची माहिती देताना सत्ता आल्यानंतर मुंबई महापालिकेच्या माध्यमातून हा आठ ते १० हजार कोटी रुपयांचा प्रकल्प राबविला जाईल, असे त्यांनी सांगितले. हा सागरी रस्ता तयार करताना कोळीवाडे अथवा गावठणांना कोणताही धक्का लावण्यात येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोळीवाडय़ांचा विकास , सागरी किनारा मार्ग, रेसकोर्सवर भव्य उद्यान तसेच मुंबईच्या पूर्व सागरी किनारपट्टीचा विकास करण्याचा मनोदयही उद्धव यांनी व्यक्त केला. मुंबईच्या पूर्व किनारपट्टी भागात नौदल तसेच बीपीटीची जागा असून त्यांना आवश्यक असलेल्या जागेव्यतिरिक्त अन्य जागा मुंबईसाठी उपलब्ध झाल्यास मुंबईचा विकास करता येईल. मुंबईच्या वाहतुकीच्यादृष्टीने महत्त्वाचा असलेला सागरी किनारा मार्ग तयार करण्याबरोबरच मुंबईकरांसाठी जागतिक दर्जाचे उद्यान पहिल्या टप्प्यात तयार केले जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.