भाजप-शिवसेना युतीतील जागावाटपाच्या प्राथमिक फेऱ्यांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहभागी होणार नसून ते राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीच अंतिम टप्प्यात चर्चा करतील. भाजपच्या प्रदेश नेत्यांशी चर्चा करण्याची त्यांची तयारी नसल्याने शिवसेनेच्या अन्य नेत्यांशी चर्चा करून जागावाटपात फारसे निष्पन्न  होण्याची शक्यता नाही. शिवसेना भाजपला अतिरिक्त जागा देण्याच्या मन:स्थितीत नसल्याने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वालाच यातून मार्ग काढावा लागण्याची चिन्हे आहेत.
गेले काही दिवस शिवसेना-भाजपमधील संबंध ताणले गेले असून ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे प्रदेश पातळीवर मार्ग कोणी काढायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेना ‘रालोआ’चा जुना सहकारी पक्ष असल्याने आणि ठाकरे हे पक्षप्रमुख असल्याने राजकीय शिष्टाचारानुसार केवळ राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीच चर्चा करण्याची त्यांची भूमिका आहे. जुन्या संबंधांमुळे ते मुंडे यांच्याशी चर्चा करीत होते. मात्र आता दोन पक्षांमधील संबंध ताणले गेल्यामुळे प्रदेश पातळीवरील भाजपच्या नेत्यांशी शिवसेनेतील अन्य नेतेमंडळींनाच चर्चा करण्याची सूचना दिली जाईल. प्रदेश पातळीवरील नेत्यांकडून जागावाटपात फारशी प्रगती होण्याची शक्यता नाही. शिवसेनेकडे १७१ आणि भाजपला ११७ जागा असे जागावाटपाचे सूत्र होते. मुंडे यांच्या मध्यस्थीमुळे केवळ २००९ मध्ये शिवसेनेने दोन जागा अतिरिक्त दिल्या होत्या. पण त्या कायम दिलेल्या नाहीत, त्या मागच्या निवडणुकीपुरत्याच दिल्या होत्या, अशी शिवसेनेची भूमिका आहे. त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वालाच जागावाटपाचा तिढा सोडवावा लागणार आहे. अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्याशी ठाकरे यांचे चांगले संबंध आहेत. मोदी यांच्या सूचनेनुसार त्यांच्याकडूनच काही मार्ग निघण्याची शक्यता आहे.