‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखामध्ये गुजराती भाषिकांवर करण्यात आलेल्या टीकेबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटली असतानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाचे कान टोचले आहेत. काही रिकामटेकडे या गोड संबंधात बिब्बा घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचा थेट हल्ला चढवत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुखपत्राच्या नेमकी विरोधी भूमिका घेतली.
महाराष्ट्र दिनी शिवसेनेच्या मुखपत्रातील संपादकीयात मुंबईतील गुजराती भाषकांच्या विरोधात भूमिका घेण्यात आली होती. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी घटकामुळे बहुसंख्य गुजराती भाषिकांनी शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान केले. मुखपत्रातील टीकेमुळे शिवसेनेचे चांगलीच गोची झाली. मराठी-गुजराती यांचे संबंध उत्तम असल्याची सारवासारव शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते सुभाष देसाई यांना तातडीने करावी लागली होती. सध्या परदेशात दौऱ्यावर असलेले उद्धव ठाकरे यांचे पत्रक शुक्रवारी प्रसिद्धीस देण्यात आले.
ठाकरे हेच सामनाचे संपादकही आहेत. ‘काही रिकामटेकडे हे संबंध बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत’ या उद्धव ठाकरे यांचा शालजोडीतील विधानाचा रोख ‘सामना’च्या कार्यकारी संपादकांकडे असावा असे म्हटले जात आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबईतील गुजराती समाजाची मते सेनेसाठी महत्त्वाची आहेत. त्यामुळेच,  शिवसेनेला मुखपत्राच्या भूमिकेपासून घुमजाव करावे लागल्याचे स्पष्ट आहे.

‘यांच्या’पासून सावध राहा – उद्धव ठाकरे<br />हिंदुत्वाच्या भूमिकेचा पुरस्कार करणाऱ्या सरकारसाठी मराठी आणि गुजराती भाषिकांनी एकत्र येऊन मतदान केले. मराठी आणि गुजराती भाषकांची ही एकजूट यापुढेही कायम राहील. या एकीमुळे आपले काय होणार या भीतीने काही रिकामटेकडे त्यात बिब्बा घालण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी संपादकीय भूमिकेपासून शिवसेनेला बाजूला केले आहे. असे प्रयत्न करणाऱ्यांपासून सावध राहा, असे आवाहनही त्यांनी केले.