लोकसभेच्या पराभवानंतर परिस्थिती बदलण्यासाठी मुख्यमंत्री अथवा सरकारकडून कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. जनतेच्या हिताचे निर्णय होत नाहीत. या पाश्र्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळण्याची शक्यता फारच कमी असून, भविष्यातील पराभवाचे आपल्याला वाटेकरी व्हायचे नसल्यानेच मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचा दावा नारायण राणे यांनी सोमवारी केला.
आधी जाहीर केल्याप्रमाणे राणे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सादर केला. यानंतर पत्रकार परिषदेत राणे यांनी राजीनाम्यामागची भूमिका विषद करताना पक्षनेतृत्व, मुख्यमंत्री यांना लक्ष्य केले. २००८ चा अनुभव लक्षात घेता राणे यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर टीकाटिप्पणी करताना सावधगिरी बाळगली. राहुल गांधी यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला थेट उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. काँग्रेस नेतृत्व म्हणजे सोनिया गांधी यांच्या दिशेने अंगुलीनिर्देश आहे का, यावरही त्यांनी फक्त नेतृत्व एवढाच उल्लेख केला.
मागे मुख्यमंत्रीपद डावलल्यावर राणे यांनी राहुल गांधी, अहमद पटेल यांच्यावर आरोप केले होते. या वेळी मात्र त्यांनी थेट तोफ डागली नाही.
जनतेच्या हिताचे निर्णयच घेतले जात नाहीत. निर्णय झाले तरी त्याची अंमलबजावणी दोन-दोन वर्षे होत नाही. सरकारच्या कारभारात भ्रष्टाचार वाढल्याची जनमानसात चर्चा आहे. अधिकारी कामे करण्यास टाळाटाळ करतात. सरकार आणि पक्षात समन्वय राहिलेला नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिमा स्वच्छ असली तरी नुसती प्रतिमा स्वच्छ असून काय उपयोग? शेवटी जनतेच्या हिताचे निर्णय झाले पाहिजेत, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले.
बारा बलुतेदार, बेरोजगारांच्या सोसायटय़ांना कामे देणे, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या जागेत झालेल्या झोपडय़ांच्या पुनर्वसनासाठी योजना राबविणे आणि मेरीटाइम बोर्डाची जागा याबद्दलचे निर्णय होऊनही त्याची अंमलबजावणी मुख्यमंत्र्यांकडून केली जात नाही, असा आरोपही राणे यांनी केला. आपले काही समर्थक सोडून जात आहेत याकडे लक्ष वेधले असतान ठाण्यातील रवींद्र फाटक यांना काहीच दिले गेले नाही. मात्र जुने गेले तरी नवीन कार्यकर्ते येतात, असेही राणे यांचे म्हणणे आहे.

उद्धव यांचा राणेंना टोला
मोठय़ा अपेक्षेने काहीजण काँग्रेसमध्ये गेले. तेथे त्यांच्या कोपराला गुळ लावण्यात आला. तो चाटता येईना आणि काढत येईना. ‘त्या’ कपाळ करंटय़ांची अवस्था आता ‘घरका ना घाटका’ अशी झाली आहे. शिवसेना सोडल्याची चुक त्यापैकी अनेकांना उमगली आहे, असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांचा नामोल्लेख टाळत लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे फुटीरांचा आणि बांडगुळांचा पक्ष आहे, अशी टिकाही त्यांनी यावेळी केली. ठाणे जिल्ह्य़ातील सेना पदाधिकाऱ्यांचा संकल्प मेळावा सोमवारी गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना उद्धव यांनी आघाडीवर सडकून टीका केली. आनंद दिघे यांच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकां-मुळे पक्ष वाढला आणि टिकलाही असा उल्लेखही त्यांनी केला.

काँग्रेस पक्षात प्रवेश केला तेव्हा आपल्याला सहा महिन्यांत मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण गेल्या नऊ वर्षांंत हा शब्द पाळला गेला नाही. आपल्याबरोबर असलेल्या आमदारांना उमेदवारी देण्यात आली नाही. कोणालाही महामंडळाचे अध्यक्षपदपदही दिले गेले नाही. कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकलो नाही. काँग्रेस पक्षावर यामुळेच मी नाराज आहे.
– नारायण राणे