नरेंद्र मोदींचे तुकडे-तुकडे करून टाकण्याची धमकी देणाऱ्या सहारनपूरचे काँग्रेस उमेदवार इमरान मसूद यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद आज, शुक्रवारी उमटले. मसूद हे त्यांच्या पक्षनेत्यांचीच भाषा बोलत असल्याचा आरोप करीत भारतीय जनता पक्षाने काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांना ‘समज’ दिली. दरम्यान, भारतीय जनता पक्ष उद्या, शनिवारी इमरान मसूद यांच्या विधानाचा विरोध करून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार आहे.
मोदींनी उत्तर प्रदेशचा गुजरात करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांचे तुकडे-तुकडे करून टाकू, अशी धमकी इमरान मसूद यांनी दिली होती. त्यामुळे बॅकफूटवर गेलेल्या काँग्रेसने कशीबशी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस पक्ष कोणत्याही हिंसेचे समर्थन करीत नाही. नरेंद्र मोदी यांना देशाच्या हितासाठी काँग्रेसचा राजकीय विरोध आहे; परंतु अशी वक्तव्ये सर्वथा चुकीची आहेत. परंतु इमरान यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी पक्षाला स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा इमरान यांनी केल्याचे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी सांगितले. ते म्हणाले की, या प्रकरणी पक्षनेत्यांनी इमरान यांना स्पष्टीकरण देण्याचा आदेश दिला आहे.
अन्य प्रवक्ते राज बब्बर यांनीदेखील इमरान यांचे वक्तव्य अत्यंत चुकीचे असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, यामुळे भाजप नेत्यांचे समाधान झाले नाही. भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. मोदीविरोधात काँग्रेस नेते वापरत असलेली भाषा लोकशाहीला शोभणारी नाही. उत्तर प्रदेशसारख्या संवेदनशील राज्यात असे वक्तव्य करून काँग्रेस उमेदवाराने हिंसाचार करणाऱ्यांना एक प्रकारे प्रोत्साहन दिले आहे. महागाई, भ्रष्टाचार, कुशासनासारख्या मुद्दय़ांपासून मतदारांचे लक्ष दूर करण्यासाठी काँग्रेसने मोदींवर खोटेनाटे आरोप करण्याचे कुभांड रचले असल्याचा आरोप त्रिवेदी यांनी केला.