मतदान करा, तो आपला हक्क आहे आणि तो आपण जरूर बजावा अशा प्रकारच्या घोषणांचे फलक यंदा ठाण्यातील नववर्ष स्वागतयात्रेत दिसणार असून यंदाची स्वागतयात्रा मतदार जागृती यात्रा ठरणार आहे. फटाकेविरहित स्वागतयात्रा काढून गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जमवण्याचे काम या स्वागतयात्रेतून होणार आहे. जमा झालेल्या मदतीमध्ये श्रीकौपिनेश्वर न्यासतर्फे एक लाखाची रक्कम भर टाकून पीडितांना देण्यात येणार आहे. गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत मंदिर न्यासाच्या वतीने ही माहिती देण्यात आली.
ठाण्यातील कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासच्या वतीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने गेल्या बारा वर्षांपासून नववर्ष स्वागतयात्रा आयोजित करण्यात येते. ठाण्यातल्या सर्वच भाषा, धर्म आणि पंथांतील सुसंस्कृत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या स्वागतयात्रेला मिळत असून यंदा सामाजिक भान जपणारी स्वागतयात्रा ठाण्यातून निघणार आहे.यंदा ४० चित्ररथ यात्रेत सामील होणार असून ठाणे महापालिका, ज्येष्ठ नागरिक, परिवहन शाखा यांचे प्रतिनिधित्व या स्वागतयात्रेत असणार आहे. शंभर जणांचे ढोल-ताशा पथक शोभायात्रेच्या अग्रक्रमी असणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून एस. सी. कर्नावट, निमंत्रक म्हणून प्रसाद दाते आणि सहनिमंत्रक म्हणून निशिकांत महांकाळ काम पाहणार आहेत.