भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी या दोघांमध्ये अटीतटीच्या ठरलेल्या आणि नरेंद्र मोदी व राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचा जणू कौलच ठरत असलेल्या २०१४च्या लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी महाराष्ट्रातील विदर्भासह ११ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशात झालेल्या मतदानात मोठा उत्साह दिसून आला. अनेक भागांत मतदानाचे प्रमाण लक्षणीररित्या वाढले असून दिल्ली आणि केरळात सायंकाळी सहाची मुदत संपूनही हजारो मतदार रांगेत उभे असल्याने तेथील प्रमाण वाढणार आहे. केरळमध्ये सर्वाधिक ७३.२ टक्के मतदान झाले आहे.
दिल्लीत सकाळी सात वाजता मतदान सुरू झाले. पहिल्या दोन तासांत मतदान संथगतीने सुरू होते आणि अवघ्या दहा टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. दुपारी एकपर्यंत ४० टक्के, तीनपर्यंत ५२ टक्के आणि सायंकाळी सहापर्यंत ६४ टक्के मतदान झाले. दिल्लीतील सातही लोकसभा मतदारसंघांत २००९च्या निवडणुकीत काँग्रेसनेच विजय मिळविला होता. या वेळी मात्र मोदी लाट आणि आम आदमी पक्षाचे आव्हान यामुळे काँग्रेसची कसोटी लागली आहे.
कपिल सिब्बल, कृष्ण तीर्थ, अजय माकन, संदीप दीक्षित, राजमोहन गांधी हे काँग्रेसतर्फे तर हर्ष वर्धन, मीनाक्षी लेखी, मनोज तिवारी हे भाजपतर्फे रिंगणात आहेत. दिल्लीत तीन लाख ३७ हजार युवा मतदार मतदानाचा हक्क प्रथमच बजावणार आहेत.
उत्तर प्रदेशात ६५ टक्के
दंगलग्रस्त मुजफ्फरनगरसह पश्चिम उत्तर प्रदेशातील १० मतदार संघात झालेल्या निवडणुकीत ६५ टक्के मतदान झाले. तेथे १४६ उमेदवार उभे आहेत. २००९मध्ये या मतदारसंघांत ५१.३० टक्के मतदान झाले होते. २०१२च्या विधानसभा निवडणुकीसाठी ६१.७८ टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत या निवडणुकीसाठीच्या मतदानात चांगली वाढ झाली आहे.
हरयाणात ७३, चंडीगढमध्ये ७२ टक्के
हरयाणात १० मतदार संघांत ७३ टक्के मतदान झाले. २००९च्या निवडणुकीत तेथे ६८ टक्के मतदान झाले होते. २३० उमेदवार रिंगणात असून त्यात उद्योजक नवीन जिंदाल, राव इंद्रजीत सिंग आणि योगेंद्र यादव हे प्रमुख आहेत.  चंडीगढमध्ये तब्बल ७२ टक्के इतके विक्रमी मतदान झाले.  केरळात ७३.२ टक्के मतदान झाले. वेळ संपल्यानंतरही मतदारांच्या रांगा कायम असल्याने हे प्रमाण वाढणार आहे.
मीरा कुमार यांचे मतदान चुकले
लोकसभेच्या मावळत्या सभापती मीरा कुमार या सध्या सासराम या आपल्या मतदारसंघात प्रचारात व्यग्र असल्याने आपले मत देऊ शकल्या नाहीत. त्यांचे नांव मतदार म्हणून दिल्ली येथील न्यू फ्रेंडस् कॉलनी येथील यादीत होते. मात्र, बिहारमध्ये असल्याने त्या मतदान करू शकल्या नाहीत.
‘ज्येष्ठां’चा दांडगा उत्साह
नवी दिल्लीत मतदारांचा प्रतिसाद उत्साही असला तरी विशेष नजरेत भरणारी बाब म्हणजे ज्येष्ठ नागरिक मोठय़ा संख्येने मतदानास उतरले होते. कडक उन्हाळा किंवा मोठय़ा रांगा यापैकी एकही बाब त्यांच्या उत्साहास बाधा आणू शकली नाही. या नागरिकांमध्येही पंच्याहत्तरी उलटलेल्यांचा भरणा अधिक होता.
सत्यपाल सिंह यांना धक्काबुक्की
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि भाजपचे बाघपत मतदारसंघाचे उमेदवार सत्यपाल सिंह यांना मालकपूर मतदानकेंद्रावर एका अज्ञात व्यक्तीने धक्काबुक्की केली. निवडणूक कशी चालली आहे हे पाहण्यासाठी सत्यपाल सिंह बाघपत येथील केंद्रावर गेले होते. त्यावेळी तिथे सुरू असलेल्या काही हालचालींवर त्यांनी आक्षेप घेतले. त्यावेळी झालेल्या बाचाबाचीत एका अज्ञात व्यक्तीने त्यांना धक्काबुक्की केली.
भारतीय मतदान पाहण्यास ब्रिटनचे उच्चायुक्त
जगातील सर्वात मोठय़ा लोकशाही देशातील मतदान प्रक्रिया पाहण्यासाठी ब्रिटनचे उच्चायुक्त सर जेम्स डेव्हिड नागपूर येथे आले होते. नक्षलवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याबाबत दिलेल्या धमक्या आणि वैशाखातील रणरणते ऊन यानंतरही भारतीय मतदारांचा उत्साह पाहण्यासाठी आपण आलो असल्याचे त्यांनी सांगितले. त्याआधी डेव्हिड हे गडकरींच्या निवासस्थानीही जाऊन आले.