पुणे आणि कलमाडी हे समीकरण पुण्याच्या निवडणुकीच्या राजकारणात पुरते भिनले आहे. कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धाच्या घोटाळ्यामुळे कलमाडींचा चेहरा काँग्रेसच्या झेंडय़ासोबत चौकाचौकात झळकेनासा झाला असला, तरी आता लोकसभा निवडणुका येऊ घातल्याने पुण्याच्या राजकारणावर सुरेश कलमाडींचे सावट मात्र दाटू लागले आहे. लोकसभेसाठी कलमाडींना काँग्रेसची उमेदवारी मिळेल किंवा नाही, यावर पुण्यात तर्कवितर्क आणि पैजादेखील सुरू झाल्या आहेत, असे म्हणतात. शेवटी जिंकणाऱ्या घोडय़ावरच पैसे लावले जातात. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतरही निवडणुकीच्या राजकारणात कलमाडींचा भाव अजून पुरता ‘पडलेला’ नाही. निवडून येण्याच्या ज्या काही क्षमता मानल्या जातात, त्या साऱ्या कलमाडींच्या ‘खिशात’ असल्याचे त्यांचे विरोधकही मानतात. त्यामुळे खरोखरीच कलमाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेच, तर त्या क्षमतेनिशी त्यांच्याशी टक्कर देण्याची ताकद भाजपच्या गिरीश बापटांना ‘कमवावी’ लागणार आहे. सध्या तरी, गिरीश बापटांनी कलमाडींच्या ‘लकबी’वर ध्यान केंद्रित केले आहे. मुंबईत विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गिरीश बापट सभागृहात आले, आणि विरोधकांच्या बाकावर बसले, तेव्हा समोरच्या सत्ताधारी बाकांवरील अनेक जण काही क्षण चक्रावून गेले असे म्हणतात. समोर चक्क कलमाडी बसले असावेत असा भासही काहींना झाला. अगदी तश्शीच दाढी.. कलमाडींसारखीच दाढी राखून गिरीश बापट आता कलमाडींसमोर उभे राहण्याची तयारी करीत आहेत.. विधान भवनाच्या आवारात तर, गिरीश बापटांकडे पाहात सारे जण ‘गोरा कलमाडी’, असेच कुजबुजत होते. साहजिकच आहे म्हणा!.. कलमाडींसारखी चेहरेपट्टी करायला गेल्यावर, चर्चा तर होणारच..