लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल अमेरिकेने शुक्रवारी भाजपचे अभिनंदन केले आहे. तसेच भारतात नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारसोबत काम करण्याबाबत अमेरिका उत्सुक असल्याचेही स्पष्ट केले.
भारतात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन केले असून नव्या सरकारशी अधिक चांगले संबंध ठेवण्यावर भर देणार असल्याचे व्हाइट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने म्हटले आहे.
आगामी काळात भारतात नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारसोबत काम करून दोन्ही देशांमधील संबंध अधिक बळकट करण्यावर भर दिला जाईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
लोकशाही मार्गाने निवडणूक यशस्वी करून दाखवण्याचे उदाहरण भारताने जगासमोर ठेवले आहे. आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही हे बिरूद सिद्ध केले आहे,  असेही ओबामांनी निवेदनात म्हटले आहे.
अमेरिकेचे मोदींना आमंत्रण
अवघ्या काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांना व्हिसा देणार का, या प्रश्नाचे उत्तर देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अमेरिकेने लोकसभेचे निकाल लागताच आपली भूमिका बदलली आहे. नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेस भेट द्यावी, असे आमंत्रणच व्हाईट हाऊसतर्फे देण्यात आले आहे