बिहारमधून १५ नोव्हेंबर २००० रोजी एनडीए सरकारच्या कार्यकाळात वेगळे झालेले झारखंड हे २८ वे राज्य. गेल्या १२ वर्षांत येथे नऊ सरकारे आणि तीन वेळा राष्ट्रपती राजवट होती. लोकसभेच्या १४ जागांसाठी येथे तीन टप्प्यांत मतदान घेण्यात येणार आहे.
राज्यात खनिज, वन आणि औद्योगिक संपदा असूनही मूलभूत प्रश्नांबरोबरच भ्रष्टाचार, विस्थापितांचे प्रश्न, आदिवासींचा विकास, कुपोषण, बेरोजगारीसह नक्षलवादाची गंभीर समस्या आहे. निवडणूक काळात उमेदवार, राजकीय नेते आणि त्यांच्या प्रचार दौऱ्यांसह मतदानाच्या दिवशी मतदारांची सुरक्षा हा मुद्दा सुरक्षा यंत्रणेच्या दृष्टीने कसोटीचा काळ ठरणार आहे.
७०च्या दशकात आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे शिबु सोरेन (गुरुजी) अल्पावधीतच आदिवासींचे नेते म्हणून ओळखले गेले. त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) पक्षाची स्थापना केली. तीन वेळा मुख्यमंत्री बनण्याचा मान त्यांना मिळाला. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळातही त्यांनी स्थान पटकावले. परंतु भ्रष्टाचार, आपल्याच खासगी सचिवाची हत्या केल्याच्या आरोपामुळे त्यांना मंत्रिमंडळातून पायउतार व्हावे लागले. त्यांचे चिरंजीव हेमंत सोरेन हे कॉंग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या सहकार्याने १३ जुलै २०१३ रोजी राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. मात्र त्यांचेही सरकार आता अल्पमतात जाण्याची शक्यता आहे, कारण त्यांच्या झामुमो पक्षाच्या दोन आमदारांनी भाजपची वाट धरली आहे, तर चार आमदार निवडणूक लढणार आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी झामुमो आणि कॉंग्रेस पक्षामध्ये युती झाली आहे. १० जागांवर कॉंग्रेस आणि चार जागांवर झामुमो निवडणूक लढणार आहे.  शिबु सोरेन हे दुमका या आपल्या पारंपरिक मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. त्यांच्या पुढे झारखंड विकास मोर्चाचे प्रमुख बाबुलाल मरांडी आणि भाजपचे उमेदवार सुनील सोरेन यांचे आव्हान आहे. तर रांचीमधून निवडणूक लढवणारे माजी केंद्रीय मंत्री कॉंग्रेसचे सुबोधकांत सहाय, स्थानिक नेते आणि राष्ट्रीय नेतेमंडळींवर कॉंग्रेसची मदार आहे.  
‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवणाऱ्या भाजपमध्येही आता घराणेशाही असल्याचे लपून राहिलेले नाही. भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांचे चिरंजीव जयंत सिन्हा यांना पक्षाने हजारीबाग येथून उमेदवारी दिली आहे. भाजपने चार जुन्या सहकाऱ्यांसह नवीन चेहऱ्यांनाही संधी दिली आहे. मात्र जमशेदपूरहून कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत संभ्रम आहे.
झाविमोचे प्रमुख माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार बाबुलाल मरांडी हे उपराजधानी दुमका येथून आपले नशाब आजमावत आहेत. तर गोड्डा येथून पक्षाचे महासचिव प्रदीप यादव निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे पक्षासह त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. लोकसभेची निवडणूक असली तरी स्थानिक मुद्दय़ांवरच येथे प्रचाराचा भर असणार आहे.
डावीकडे झुकणार जहालमतवादी राज्य
जमशेदपूर आणि राज्याची राजधानी रांजी येथे औद्योगिकीकरण झाले असले, तरी बेरोजगारीचे प्रणाम लक्षणीय आहे. खनिज आणि वनसंपदेबरोबर नक्षलवादही येथे फोफावला आहे. पिपल्स लिबरेशन फ्रन्ट ऑफ इंडिया (पीएलएफआय), झारखंड प्रस्तुती समिती (जेपीसी), तृतीया प्रस्तुती समिती (टीपीसी) या प्रमुख नक्षली संघटनांबरोबर अनेक भागात लहान गट सक्रिय आहेत. केंद्रीय गृह विभागे २०१३ मध्ये डावीकडे झुकणारे जहालमतवादी राज्य (६१२३ ’ीऋ३ ६्रल्लॠ) असे म्हटले आहे.

तीन तास सुरक्षेचे
झारखंड विकास मोर्चाचे उमेदवार खासदार बाबुलाल मरांडी आणि भाजपचे पलामू येथील उमेदवार राज्याचे माजी पोलीस महासंचालक व्ही.डी. राम हे नक्षलवाद्यांच्या हिट लिस्टवर आहेत. तर सर्वच पक्षांच्या प्रचार सभा सुरू झाल्यापासून तीन तासांतच आटोपत्या घ्याव्या लागणार आहेत. कारण निवडणूक अधिकारी आणि राज्यातील वरिष्ठ पोलीस आधिकाऱ्यांच्या बैठकीत तीन तासच सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२००९ बलाबल : एकूण जागा १४
०७ भाजप
०२ झामुमो
०२ झाविमो
०१ काँग्रेस<br />०२ अपक्ष