देशातील मुस्लिमबांधव देखील मला इतर भारतीयांप्रमाणेच समान दर्जाचे आहेत. भारतातील प्रत्येक नागरिकांप्रमाणे समाजातील मुस्लिम बांधवांपर्यंत पोहोचणे ही माझी जबाबदारी समजतो. असे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी ‘एबीपी न्यूज’ या वृत्तवाहिनीच्या ‘घोषणापत्र’ या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत म्हटले. तसेच राम मंदिराच्या मुद्द्यावर मोदींनी, कायद्याच्या चौकटीत राहून राम मंदिराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपचे प्रयत्न राहतील. असे स्पष्टीकरण दिले.
मोदी म्हणाले, “प्रत्येक भारतीय माझ्यासाठी समान आहे आणि प्रत्येक समाजापर्यंत पोहोचणे ही माझी जबाबदारी समजतो. गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून मी राज्याच्या सहा कोटी जनतेत एकता ठेवण्याचे माझे प्रयत्न राहीले आहेत आणि आता माझ्यावर राष्ट्रीय जबाबदारी आहे. त्यामुळे देशातील १२५ कोटी जनतेपर्यंत पोहोचण्यासाठीचे प्रयत्न माझ्याकडून सुरू राहतील आणि ही माझी जबाबदारी असल्याने ती पार पाडणे हे माझे कर्त्यव्य आहे. त्यासाठी मी किती जलद गतीने प्रयत्न करतो हे माझ्यासाठी महत्वाचे नाही. मी देशाची एकता अबाधित राखणे हे माझ्यासाठी महत्वाचे आहे.” असेही मोदी म्हणाले.
“मला कोणत्याही रंगा खाली खेचण्याचा कोणीही कितीही प्रयत्न केला तरी तसे मी होऊ देणार नाही. मला फक्त एकच गोष्ट माहिती आहे आणि ती म्हणजे, देशातील प्रत्येक जण भारतीय आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचणे हे माझी जबाबदारी आहे. तसेच प्रत्येक नेत्याने देशातील सर्व समाजाच्या नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायला हवा असे माझे मत आहे.” असेही मोदी म्हणाले.