लोकसभा निवडणुकीत निर्णायक कौल मिळाल्यानंतर भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी सर्व राजकीय पक्ष आणि नेत्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन शुक्रवारी केले. तसेच समाजातील सर्व घटकांना योग्य न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीन, असे त्यांनी सांगितले.
निवडणूक निकालानंतर ४५ मिनिटांच्या विजयी भाषणात मोदी म्हणाले की, आपले सरकार हे एका पक्षाचे नाही तर देशातील साऱ्या जनतेचे आहे. सरकार सर्व घटकांचाच विचार करणार असल्याचे सांगत ५.७० इतक्या प्रचंड मतांनी विजयी केल्याबद्दल त्यांनी उपस्थित नागरिकांचे आभार मानले.
घटनेच्या अधीन राहून प्रामाणिकपणे देशाचा कारभार चालवताना सर्वाचे हित पाहण्याची माझी जबाबदारी राहील, असे मोदी म्हणाले.
लोकशाहीत कोणीही शत्रू नसतात तर केवळ स्पर्धक असतात. स्पर्धा ही आपल्या लोकशाहीचे सौंदर्य आहे. या निवडणुकीच्या निकालाने ही स्पर्धा संपली असल्याचे सांगत ‘सबका साथ, सबका विकास’ करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसभा आणि काही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे त्यांनी अभिनंदन केले. तसेच देशाचा कारभार चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी सर्व खासदार आणि आमदारांचा आपल्याला पाठिंबा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.