धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही शक्तींना सक्षम करण्यासाठी पुढील महिन्यात वाराणसी येथे प्रख्यात लेखक, बुद्धिजीवी आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवर एक परिषद घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी वाराणसी येथील नरेंद्र मोदी यांची उमेदवारी आणि भारतीय जनता पक्षाची विचारधारा लक्षात घेत या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
नरेंद्र मोदी हे ज्या आक्रमक आणि सांप्रदायिक समुदायाचे नेतृत्व करू पाहात आहेत, त्या शक्तींना उलथवून लावण्यासाठी सदर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ‘प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशन’च्या उत्तर प्रदेश विभागाचे सरचिटणीस संजय श्रीवास्तव यांनी दिली. ४ मे रोजी सदर परिषद होणार असून, या कार्यक्रमासाठी नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन, बुकर पारितोषिक विजेत्या अरुंधती रॉय, गुलजार, शबाना आझमी, महेश भट यांच्यासारखे चित्रपट क्षेत्रातील मान्यवर आदींना सहभागी व्हावे म्हणून आमंत्रणे पाठविण्यात आली आहेत, असेही श्रीवास्तव यांनी नमूद केले.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक यू. आर. अनंथमूर्ती,  गिरीश कर्नाड, हिंदी लेखक नमवर सिंग, अशोक वाजपेयी, विभूती नारायण राय यांच्या निवड समितीने या परिषदेतील मान्यवरांची निवड केली आहे. वाराणसीत होणाऱ्या मतदानाच्या आठवडाभर आधी सदर परिषद वाराणसीत होणार आहे. देशाला आणि समाजाला विभागणाऱ्या शक्तींना विरोध हे आमचे उद्दिष्ट असून आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. आमच्या या प्रयत्नांना जनतेने सकारात्मक प्रतिसाद द्यावा आणि सांप्रदायिक लोकांना सत्तेपासून दूर ठेवावे, असे आवाहन त्यांनी केली आहे.