कित्येक तासांच्या वीज भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या ग्रामीण भागातील जनतेच्या असंतोषाचा फटका सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीऐवजी रावेर मतदारसंघातील भाजप उमेदवार रक्षा खडसे यांना बसला. जामनेर तालुक्यातील तळेगाव येथे खडसे यांच्या वाहनांना गावात प्रवेश नाकारण्यात आला. तसेच वाहने परत जात असताना काही जणांनी दगडफेकही केली. रक्षा या विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आहेत.
तळेगाव येथे काही दिवसांपासून १४ ते १६ तास वीज गायब होत आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी उपकेंद्रावर मोर्चा काढून तोडफोडही केली होती. राजकीय मंडळींना गावात प्रवेश करू द्यावयाचा नाही. असा निर्धारही ग्रामस्थांनी केला आहे. रविवारी रात्री आठच्या सुमारास भारनियमनामुळे ग्रामस्थ वीज उपकेंद्राजवळ जमले होते. त्याचवेळी रक्षा खडसे यांच्या वाहनांचा ताफा आला. ग्रामस्थांनी वेशीवरच त्यांची वाहने अडवली. या भागातील आ. गिरीश महाजन हेही या ताफ्यात असतील असे ग्रामस्थांना वाटले होते. ग्रामस्थांनी भारनियमनाची समस्या मांडली. जामनेरच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांनी आमदारांना भारनियमन कमी करण्यास सांगण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर वाहने सोडण्यात आली. परंतु वाहनांचा ताफा जात असताना काही युवकांनी दगडफेक केली.