लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या दर्जावरून काँग्रेस लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना लक्ष्य करीत असल्याबद्दल सरकारने मंगळवारी काँग्रेसवरच हल्ला चढविला. काँग्रेस पक्षाच्या कृतीवरून ते किती उतावीळ झाले आहेत तेच प्रतिबिंबित होत आहे. काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही मिळू नये असा कौलच जनतेने दिला असल्याचा दावा सरकारने केला आहे.
लोकसभेच्या अध्यक्षांवर आरोप करणे ही निषेधार्ह आणि अस्वीकारार्ह बाब आहे, जनतेने काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले, इतकेच नव्हे तर ५५ जागांवरही विजय मिळू दिला नाही त्याला आम्ही काय करणार, आम्ही कशी मदत करणार, असा सवाल संसदीय कार्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला.

विरोधी पक्षनेतेपद मिळणे हा काँग्रेसचा हक्क आहे, मात्र सरकार त्या पदावरून क्षुल्लक राजकारण करीत आहे. सभापती निष्पक्ष राहतील अशी आशा आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.