अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. राज्याच्या स्थापनेपासून काही अपवाद वगळता या राज्यातील मतदारांनी आपले दान काँग्रेसच्याच पारडय़ात टाकले आहे. मात्र या
वेळी होत असलेल्या निवडणुकीत राज्याचे माजी मुख्यमंत्री गेगाँग अपांग हे भाजपच्या गळाला लागले असल्याने काँग्रेसपुढे आपल्या दोन्ही जागा टिकविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. चीनने केलेली घुसखोरी आणि अरुणाचल प्रदेशमधील निदो तानियाचा वर्णद्वेषातून करण्यात आलेल्या हल्ल्यात झालेला मृत्यू यामुळे तेथील विद्यार्थी संघटनाही अधिकच आक्रमक झाल्या आहेत.
देशाच्या पूर्वेकडील सेव्हन सिस्टर्सपैकी एक अरुणाचल प्रदेश. उगवत्या सूर्याचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या राज्याला गेल्या वर्षी चीनकडून झालेल्या घुसखोरीचे आणि त्यानंतर वर्णद्वेषाचे ग्रहण लागले. अरुणाचल प्रदेशमध्ये येत्या ९ एप्रिल रोजी लोकसभेसमवेतच विधानसभेचीही निवडणूक होणार आहे. आतापर्यंत या राज्याने काँग्रेसच्या पारडय़ातच माप टाकले असले तरी चीनकडून झालेली घुसखोरी आणि
दिल्लीत निदो तानिया या विद्यार्थ्यांचा दुकानदारांनी केलेल्या मारहाणीत झालेला मृत्यू यामुळे तेथील मतदार या निवडणुकीत कोणाच्या पारडय़ात आपले मत टाकतील, याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. निदो तानिया हा विद्यार्थी अरुणाचल प्रदेशमधील काँग्रेसचे आमदार निदो पवित्रा यांचा मुलगा होता. सत्तारूढ पक्षाच्या आमदारपुत्राची ही गत होत आहे, तर सर्वसामान्यांचे काय, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
ईशान्येकडील राज्यांमध्ये विद्यार्थी संघटनांचे अनेक ठिकाणी प्राबल्य आहे आणि त्याच्या जोरावरच या संघटना दबावगट म्हणूनही कार्यरत आहेत. निदो तानियावर वर्णद्वेषातून हल्ला होऊन त्यामध्ये तो मृत्युमुखी पडल्यानंतर या विद्यार्थी संघटना अधिकच आक्रमक झाल्या आहेत. सात राज्यांमधील विद्यार्थी संघटनांनी मिळून एक मोठा दबाव गटही स्थापन करण्यासाठी पावले उचलली आहेत.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हेही ईशान्येकडील राज्यांवर लक्ष ठेवून आहेत. या भागातील राज्यांमधील युवावर्ग स्वत:ला भारतीय मानत नाहीत, असे बोलले जाते. त्यामुळे या राज्यांमध्ये पर्यटनाला जाणाऱ्या भारतीयांना ते ‘आर यू इंडियन’ असा प्रश्नही विचारण्यास कचरत नाहीत, असे बोलले जाते. मोदी यांनी आता अखंड राष्ट्रीयत्वाचा नारा दिला आहे. आपल्या घोषणेद्वारे तरुणवर्गाला आकर्षित करण्यात मोदी कितपत यशस्वी होतात तेही महत्त्वाचे आहे.
भाजपने प्रथम आपला मोर्चा दक्षिणेकडील राज्यांकडे वळविला होता. मात्र त्यामध्ये कर्नाटक वगळता अन्य कोठेही यश न मिळाल्याने त्यांनी आता ईशान्येकडील राज्यांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्रिपद दोन वेळा भूषविणाऱ्या गेगाँग अपांग यांना भाजपमध्ये आणण्यात यश मिळाल्याने ईशान्येकडील राज्यांत एका अर्थाने भाजपने शिरकाव केल्याचे बोलले जात आहे. भाजपने ‘सरहद को प्रणाम यात्रा’ सुरू केली असून त्याद्वारे अरुणाचल प्रदेशातील विविध भागांना भेटी दिल्या आहेत. सीमेवरील भागांतील वस्तुस्थिती काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्नही पक्षाने केला आहे.
अरुणाचल प्रदेश राज्य अस्तित्वात आल्यापासून काही अपवाद वगळता मुख्यत्वे काँग्रेसचेच प्राबल्य या राज्यावर राहिले आहे. अरुणाचल प्रदेश (पूर्व) आणि अरुणाचल प्रदेश (पश्चिम) असे लोकसभेचे दोन मतदारसंघ असून त्यांचे प्रतिनिधित्व अनुक्रमे निनोंग एरिंग आणि तकम संजॉय हे काँग्रेसचे खासदार करीत आहेत, तर नबम तुकी हे मुख्यमंत्री आहेत. या पाश्र्वभूमीवर काँग्रेस या राज्यातील प्राबल्य टिकवून ठेवतो की मोदी यांचे आवाहन प्रभावी ठरते हे ९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाद्वारे ठरणार आहे.
प्रमुख उमेदवार
*निनोंग एरिंग – काँग्रेस (अरुणाचल पूर्व)
*तकम संजॉय – काँग्रेस (अरुणाचल पश्चिम)
*तापिर गाओ – भाजप (अरुणाचल पूर्व)
*किरेन रीजिजू – भाजप (अरुणाचल पश्चिम)
२००९ बलाबल
एकूण जागा २
काँग्रेस ०२
संग्रहित लेख, दिनांक 29th Mar 2014 रोजी प्रकाशित
भाजपचे काँग्रेसपुढे कडवे आव्हान
अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. राज्याच्या स्थापनेपासून काही अपवाद वगळता या राज्यातील मतदारांनी आपले दान काँग्रेसच्याच पारडय़ात टाकले आहे.

First published on: 29-03-2014 at 02:47 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp tough challenge for congress in arunachal pradesh