संजय गांधी निराधार योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी न्या. सावंत आयोगाने ठपका ठेवला असता डॉ. विजयकुमार गावित यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने तेव्हा आकाशपाताळ एक केले होते. मात्र याच डॉ. गावित यांच्या कन्येला उमेदवारी देऊन भाजपने त्यांना आपलेसे केले.
आघाडी सरकारमधील डॉ. पद्मसिंह पाटील, सुरेश जैन, नवाब मलिक आणि डॉ. विजयकुमार गावित या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या गैरव्यवहारांबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोहीमच उघडली होती. २००३ मध्ये भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधातील कारवाईसाठी सुमारे आठवडाभर मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण केले असता, या मंत्र्यांच्या चौकशीची मागणी तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मान्य केली होती. चौकशीसाठी न्या. सावंत आयोगाची नेमणूक करण्यात आली होती. न्या. सावंत आयोगाने चारही मंत्र्यांच्या विरोधात ताशेरे ओढले होते. चौकशी अहवालावरून तीन मंत्र्यांनी राजीनामे दिले, पण डॉ. गावित यांना राष्ट्रवादीने अभय दिले होते. डॉ. गावित यांच्याविरोधात ताशेरे ओढण्यात आले असले तरी संजय गांधी निराधार योजनेतील प्रकरण फारसे गंभीर नाही, अशी भूमिका तेव्हा राष्ट्रवादीने घेतली होती. परिणामी डॉ. गावित यांचे मंत्रिपद वाचले होते. डॉ. गावित यांच्या राजीनाम्यासाठी तेव्हा भाजपने सभागृह दणाणून सोडले होते. एकनाथ खडसे यांनी गावित यांना लक्ष्य केले होते. सरकार भ्रष्ट मंत्र्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप तेव्हा भाजपने केला होता. याच भाजपने गावित यांच्या कन्येला उमेदवारी दिली, पण गावित यांनाही पक्षात प्रवेश दिला जाणार आहे.
गावित यांची पक्षातूनही हकालपट्टी
मुलीला भाजपची उमेदवारी देण्यात आल्याने डॉ. विजयकुमार गावित यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीमधूनही त्यांची हकालपट्टी केली जाणार असल्याचे पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी जाहीर केले. तसेच हीना गावित यांच्या प्रचारात सहभागी होणाऱ्यांच्या विरोधातही अशीच कारवाई करण्यात येईल. नंदुरबार जिल्हय़ाची जबाबदारी धुळ्यातील किरण शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.