उमेदवाराच्या चेहऱ्याचा मुखवटा.. टोप्या.. यांचे वाटप करत ईशान्य मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील यांची प्रचार फेरी सुरू झाली. कार्यकर्त्यांनी संध्याकाळी पाच वाजताच गोवंडी येथील शिवाजीनगर सिग्नलजवळ असलेल्या कार्यालयात तयारी ठेवली होती. पाटील यांच्या प्रतीक्षेत सारे होतेच. पण त्यांना उशीर होत असल्याचे समजताच आदेशानुसार प्रचार फेरी उमेदवाराशिवायच सुरू झाली. फेरीसाठी आणलेल्या जीपमध्ये अर्थात रथामध्ये विराजमान होण्यासाठी हवशे-नवशांची एकच झुंबड उडाली होती. मग स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही संधी साधत पुढच्या बाजूस विराजमान होण्याची संधी पटकावली.
उमेदवाराने काय काय कामे केलीत, एक दो एक दो मोदी को फेक दो, एकच भाऊ संजय भाऊ, अशा एक ना अनेक घोषणा करत प्रचार फेरी गौतमनगरमध्ये पोहोचली अन् घरातून बाहेर डोकवणारे चेहरे दिसू लागले. सर्वाना आपला उमेदवार पाहण्याची उत्सुकता होती पण उमेदवारच नव्हता. लहान मुलांना मात्र मुखवटा आणि टोप्या मिळत असल्यामुळे ते प्रचारफेरी भोवती बागडत होते. या परिसरात ठरलेले मान सन्मान स्थानिक नेत्यांनीच स्वीकारले आणि रहिवाशांची मने राखली. रथ गल्लीबोळ्यातूनच नव्हे तर भर बाजारातून वाट काढत जात होता. िलबोनी बाग परिसरातही मराठी आणि मुस्लिम बांधवांना खास आकर्षति करून घेण्याचा प्रयत्न होता. रथावरील महारथींना हार घालण्यासाठी या परिसरात सर्वानी एकच गर्दी केली होती. ईशान्य मुंबईत मराठी मतदार आपल्याच पक्षाला मत देणार याची खात्री राष्ट्रवादीला वाटत असली तरी यंदा मात्र येथून आम आदमी पक्षाच्या मेधा पाटकर उभ्या असल्यामुळे ही मते विभागली जाण्याची भीती मनोमन कुठेतरी कार्यकर्त्यांना वाटत होती. यामुळेच महिला कार्यकर्त्यां प्रचार करताना ‘या ताईला सांगा, या माईला सांगा, या काकाला सांगा, या दादाला सांगा’ अशी आपुलकीची हाक देऊन विनवत होत्या. प्रचारात काहीप्रमाणात परिसरातील मुस्लिम बांधवांनीही सहभाग घेतला होता. मात्र, संजय पाटील यांना येण्यास उशीर होत असल्यामुळे कार्यकर्त्यांची चलबिचल होत होती.. अन् उमेदवार आला
‘यात्रा हायवेला न्या भाऊ येताहेत’ अशी आरोळी ऐकू आली आणि पुन्हा नवा उत्साह संचारला अन् संजय पाटील प्रकटले. रथावर उमेदवार विराजमान झाल्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला अन् प्रचारास जोर आला. गुजराती मतांची शाश्वती नसली तरी मुस्लिम बांधव आणि मराठीजनांची मते मिळवण्यासाठी भाऊंना चांगलीच कसरत करावी लागत आहे. पण आपला जनसंपर्क आणि कार्य यामुळे मराठी मते मिळण्याचा विश्वास त्यांना आहे. यानंतर इंडियन ऑइल नगरहून शिवाजीनगर पोलीस ठाण्याला वळसा घालून एमएमआरडीए पुनर्वसन इमारतींजवळ यात्रा आली. या वस्तीमध्ये पाटील यांनी बराचवेळ दिला. प्रत्येक गल्लीतून फेरी जाईल याची काळजी घेतली.