मी, माझा, माझे ही भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची निवडणूक प्रचार संकल्पना असून त्याद्वारे ते बहुसंख्याकवादाचाच पुरस्कार करीत असल्याची टीका केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी केली आहे.
बहुसंख्याकवाद हाच मोदी यांचा अघोषित कार्यक्रम असून त्याच्या जोडीला मी, माझा, माझे ही संकल्पना आहेच. भारताच्या संकल्पनेला मोदी यांच्याकडून धोका असल्याचेही त्यांनी खंडन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारताची संकल्पना नष्ट करू शकत नाही. एखादा राजकीय पक्ष अथवा राजकीय नेता ही संकल्पना नष्ट करू शकेल इतकी ती कमकुवत नाही, असेही चिदम्बरम म्हणाले.
न्यायालयाने २००२ च्या दंगलीच्या खटल्यातून मोदी यांना सर्व आरोपांतून निर्दोष असल्याचा निर्वाळा दिला का, असे विचारले असता चिदम्बरम यांनी नकारार्थी उत्तर दिले. गुजरातमध्ये २००२ मध्ये काय झाले त्यामध्ये दोन घटक महत्त्वाचे आहेत. पहिला कायदेशीर तर दुसरा नैतिक आणि राजकीय उत्तरदायित्वाचा घटक आहे.
पहिल्या घटकाचा विचार करता ही बाब न्यायप्रविष्ट आहे. मात्र राजकीय आणि नैतिक दायित्व मुख्यमंत्री या नात्याने मोदी यांचेच आहे. मात्र गेल्या १२ वर्षांत त्यांनी ते मान्य केले नाही. इतकेच नव्हे तर, मी दिलगिरी व्यक्त करतो, इतकेही म्हणणे म्हणण्याचे सौजन्य त्यांनी दाखविले नाही ही दुर्दैवाची बाब आहे, असेही अर्थमंत्री म्हणाले.