निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम गेल्याच आठवडय़ात जाहीर केला. राज्यात १०, १७ आणि २४ एप्रिल अशा तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. राज्यातील निवडणुकीची तयारी, मतदार याद्यांमधून मोठय़ा प्रमाणावर नावे वगळण्यात आल्याने झालेला गोंधळ वा मतदार याद्यांमध्ये नावे नसणे या संदर्भात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी नितीन गद्रे यांच्याशी केलेली बातचीत.
* पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी राज्यातील एकूण मतदार किती व मतदान केंद्रांची संख्या किती?
– उमेदवार अर्ज भरण्याच्या अखेरच्या तारखेच्या दहा दिवस आधीपर्यंत मतदारांची नोंदणी करता येते. तसेच निवडणूक आयोगाने यासाठी खास अभियानही रविवारी राबविले. मतदार नोंदणीला अजूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत राज्यात ७ कोटी, ८९ लाख मतदारांची नोंदणी झाली आहे. २००९च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी राज्यात ७ कोटी, २८ लाख मतदार होते. राज्यात एकूण ८९,४७९ एवढी मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यांपैकी साडेसहा हजार संवेदनशील मतदान केंद्रे आहेत.
* प्रत्येक निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मतदार याद्यांमध्ये नावे नाहीत किंवा नावे वगळली अशा तक्रारी हमखास ऐकू येतात. हा गोंधळ यंदा तरी टाळणे शक्य आहे का?
– मतदार याद्यांमध्ये आपली नावे आहेत की नाही, याची मतदारांनी आधी खात्री केल्यास मतदानाच्या दिवशी होणारा गोंधळ टाळता येणे शक्य आहे. राज्य निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावर राज्यातील सर्व मतदार याद्या उपलब्ध आहेत. मतदार याद्यांमध्ये नाव आहे की नाही याची खातरजमा त्यातून करता येऊ शकते. तसेच कालच (रविवारी) राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर याद्या तपासण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. मतदार यादीत नाव नसल्याचे आढळल्यास अजूनही नाव नोंदविण्याची संधी आहे. मतदारांनी आधी खबरदारी घेतल्यास गोंधळ होणार नाही एवढेच.
* मतदार याद्या अद्ययावत करताना मोठय़ा प्रमाणावर नावे वगळण्यात आल्याचा आरोप राजकीय नेत्यांकडून केला जातो. याबाबत आपले मत काय?
– राज्य निवडणूक विभागाकडून मतदार याद्या अद्ययावत करण्याकरिता विशेष मोहीम राबविण्यात आली. अनेक नावे मतदार  याद्यांमध्ये एकापेक्षा जास्त वेळा होती. काही मृत मतदारांची नावे याद्यांमध्ये होती. बोगस किंवा एकापेक्षा जास्त नावे वगळणे आवश्यकच होते. काही जणांचे पत्ते बदलले होते. तर काही जणांची नावे एकापेक्षा जास्त मतदारसंघांमध्ये होती. निवडणूक आयोगाने पूर्वसूचना देऊनच मतदार याद्यांमध्ये सुधारणा केली. यासाठी राजकीय पक्षांना विश्वासात घेण्यात आले. मतदार याद्या जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी राजकीय नेत्यांना वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिल्यावर विरोध करणाऱ्या नेत्यांचे समाधान झाले.
* मतदार याद्या अद्ययावत करताना किती नावे वगळण्यात आली?
– मतदार याद्या अद्ययावत करण्याकरिता राबविण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्यात सुमारे ५० लाखांच्या आसपास नावे वगळण्यात आली. यातील काही मतदार मृत झाले होते. काही मतदारांची नावे एकापेक्षा जास्त वेळा होती किंवा त्यांनी पत्ता बदलला होता. ठाणे जिल्ह्य़ात सर्वाधिक सुमारे साडेसहा लाख तर मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्य़ांमध्ये सुमारे पाच लाखांच्या आसपास नावे वगळण्यात आली. नावे वगळताना पूर्णपणे खबरदारी घेण्यात आली. कोणाला आरोप करण्याची संधी मिळणार नाही यावर भर देण्यात आला होता. एवढी नावे वगळल्यावर काही जणांकडून विरोधात सूर निघणार हे ओघानेच आले. पण जाणूनबुजून नावे वगळली अशी उदाहरणे कोठेच समोर आलेली नाहीत. जेथे आक्षेप किंवा हरकती घेण्यात आल्या तेथे सुनावणी देण्यात आली. कोणत्याही मतदारावर अन्याय होणार नाही यावर निवडणूक आयोगाचा कटाक्ष होता.
* नव्याने किती मतदारांची नोंदणी झाली?
मतदार याद्या अद्ययावत करताना सुमारे ५० लाख नावे वगळण्यात आली असली तरी नव्याने आतापर्यंत सुमारे ४० लाख नव्याने नोंदणी झाली आहे. अजूनही नावे नोंदणीची प्रक्रिया सुरूच आहे. आतापर्यंत सर्वाधिक पाच लाख मतदार नोंदणी ठाणे जिल्ह्य़ात तर मुंबईत चार लाख नव्या मतदारांची नोंदणी झाली. पुणे जिल्ह्य़ात सुमारे सव्वा तीन लाख मतदारांची नोंदणी झाली.
* देशात पहिल्यांदा मतदान करणाऱ्या युवकांची संख्या मोठी आहे. साधारणपणे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात लाखभर सरासरी नव मतदारांची भर पडली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच नावे नोंदविलेल्यांची संख्या किती आहे वा १८ वर्षे पूर्ण झालेल्यांचा मतदार नोंदणीकरिता प्रतिसाद तेवढा उत्साहवर्धक नव्हता?
महाराष्ट्रात आतापर्यंत सुमारे २० लाख पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची नोंदणी झाली आहे. मात्र ही नोंदणी अधिक होणे अपेक्षित होते.
* राज्यात किती टक्के मतदारांना मतदान ओळखपत्रे मिळाली आहेत. याबाबत राज्यात काम संथ गतीने झाले आहे, अशी टीका होते का?
– राज्यात आतापर्यंत ९२ टक्के जास्त मतादारांना मतदान ओळखपत्रांचे वाटप झाले आहे. पूर्वी काय झाले याची माहिती नाही, पण आता हे काम जलद गतीने करण्यात आले.
*  राज्यात तीन टप्प्यांत मतदान घेण्याचे कारण काय ?
– गेल्या सार्वत्रिक निवडणुकीतही राज्यात तीन टप्प्यांत मतदान झाले होते. पहिल्या टप्प्यात विदर्भातील १० मतदारसंघांत १० एप्रिलला मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात १७ एप्रिलला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात मतदान होईल. २४ एप्रिलला शेवटच्या टप्प्यात मुंबई, ठाणे, उत्तर महाराष्ट्रात मतदान होईल. सुरक्षेच्या कारणास्तव निवडणूक आयोगाने टप्प्याटप्प्याने मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.
* नक्षलग्रस्त किंवा संवेदनशील भागात कोणती विशेष खबरदारी घेण्यात आली आहे ?
– सुरक्षेच्या कारणास्तव सारी माहिती उघड करणे योग्य होणार नाही. पण निवडणूक आयोगाने सुरक्षा यंत्रणांशी चर्चा करून योग्य ते खबरदारीचे उपाय योजले आहेत. राज्यात सुमारे ६५० मतदान केंद्रे ही अतिसंवेदनशील आहेत. या मतदान केंद्रांबाबत वेगळी सुरक्षा पुरविली जाईल. राज्यात मतदान शांततेने पार पडते हा पूर्वइतिहास आहे. यामुळे कोणताही गोंधळ होणार नाही.
* आचारसंहिता हा कळीचा मुद्दा निवडणुकीच्या काळात ठरतो. सध्या राज्यात गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या मदतीबाबत निवडणूक आयोगाचा सल्ला घेण्यात येईल, असे सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. याबाबत आयोगाची भूमिका कोणती असेल?
– नैसर्गिक आपत्ती आल्यास आचारसंहितेच्या काळात मदतकार्यात कोणतीही अडचण येत नाही. याबाबत निवडणूूक आयोगाच्या सूचना स्पष्ट आहेत. मदतीबाबत आयोगाचा काहीच आक्षेप राहणार नाही. सरकारकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. प्रस्ताव आल्यावर निवडणूक आयोगाच्या नवी दिल्लीतील अधकाऱ्यांशी चर्चा करून लगेचच निर्णय घेतला जाईल. शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे हे महत्त्वाचे आहे.
* राज्यात मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून निवडणूक आयोगाकडून काही प्रयत्न करण्यात येत आहेत का?
– देशातील मतदानाची सरासरी टक्केवारी ही ६० टक्के असताना गेल्या वेळी महाराष्ट्रात ५०.७१ टक्केच मतदान झाले होते. मतदार  याद्यांमध्ये नाव असलेल्यांनी मतदानाचा अधिकार बजवावा, अशी आयोगाची भूमिका आहे. मतदारांमध्ये जनजागृती करण्याकरिता निवडणूक आयोगाच्या वतीने विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत आहे. चित्रपट अभिनेता आमीर खान यानेही जनजागृतीसाठी पुढाकार घेण्यास मान्यता दिली आहे.