नागपूर लोकसभा मतदारसंघात बसप व आपचे उमेदवार किती मते खेचतात, यावरच काँग्रेस व भाजपच्या उमेदवारांचा जय-पराजय अवलंबून आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने यंदाही खासदार विलास मुत्तेमवार यांची उमेदवारी कायम ठेवली असून
भाजपने माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याआधी दोनदा खासदार राहिलेले जांबुवंतराव धोटे हे फॉरवर्ड ब्लॉककडून पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. आपने अंजली दमानिया यांना उमेदवारी दिली आहे.
या मतदारसंघात अनसूयाबाई काळे (दोनदा), नरेंद्र देवघरे, गेव्ह आवारी, जांबुवंतराव धोटे, बनवारीलाल पुरोहित, दत्ता मेघे, विलास मुत्तेमवार हे काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेले आहेत. १९५१ ते २००९ या पंधरा निवडणुकीत बारा वेळा काँग्रेस उमेदवार निवडून आले आहेत. १९६२ मध्ये अपक्ष (बापूजी अणे), १९७१ मध्ये अ.भा. फॉरवर्ड ब्लॉक (धोटे) व १९९६ मध्ये भाजपचा उमेदवार (पुरोहित) निवडून आला.
काँग्रेसचे विलास मुत्तेमवार १९९८ ते २००९ या काळात चार वेळा निवडून आले असले तरी काँग्रेसच्या मतांची घसरण झाली आहे. गेल्या निवडणुकीत बसपचे माणिकराव वैद्य यांनी १ लाख १८ हजार ७४१ मते खेचली. विलास मुत्तेमवार सलग चारदा निवडून आले असले तरी गेल्या पाच वर्षांत त्यांचे दर्शन मतदारांना अभावानेच झाले.
नितीन गडकरी यांनी दोन वर्षांपासून तयारी सुरू केली आहे. या मतदारसंघात सहापैकी चार आमदार भाजपचे आहेत. गडकरींवर गैरप्रकाराचा आरोप करून यंदा प्रथमच आपच्या अंजली दमानिया यांनी मुत्तेमवार व गडकरींना आव्हान दिले आहे. अरविंद केजरीवाल यांच्यासह मिरवणुकीने फिरून, तसेच कस्तुरचंद पार्कवरून मुत्तेमवार व गडकरींची एका उद्योगात संयुक्त गुंतवणूक असल्याच्या आरोपाचा नवा तोफगोळा सोडून या मतदारसंघात त्यांनी राजकीय वातावरण तापवणे सुरू केले आहे.
जिल्ह्य़ाच्या मुख्य समस्या
* भ्रष्टाचार
* महागाई
* बेरोजगारी
* विजेचे भारनियमन
* मिहानकडे दुर्लक्ष
नागपूर लोकसभा मतदारसंघ
एकूण मतदार १८ लाख ५० हजार ९३७
(५ मार्च २०१४ रोजी)
विधानसभा मतदारसंघ-
पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, मध्य, दक्षिण-पश्चिम.
वि.सभा आमदार-चार भाजप, दोन काँग्रेस
नितीन गडकरी – निवडून आल्यावर किमान ५० हजार जणांना रोजगार देण्यास प्राधान्य राहणार आहे. गरिबांना परवडणाऱ्या किमतीत १ लाख घरे बांधून दिली जातील. हे काम निर्धारित मुदतीतच पूर्ण करू. भोपाळ व इंदूर येथून लोकसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह होत होता. शिवाय, वर्धा व भंडारा सुरक्षित असूनही नागपूरमधून निवडणूक लढविण्याचा निश्चय केला. अनेकांच्या समस्या सोडविण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. अनेक रुग्णांना आर्थिक मदत केली. गेल्या २५ वर्षांत झाला नाही एवढा विकास करून दाखावू. नागपूरच्या विकासाचे चित्र बदलविण्याचे स्वप्न सर्वाच्याच माध्यमातून पूर्ण करू.
विलास मुत्तेमवार – चिमूरला असताना गोसेखुर्द, नागपुरात मिहान, मेट्रो, हज हाउस, विविध रेल्वेगाडय़ा आदी अनेक कामांची जंत्रीच मुत्तेमवार यांनी सादर केली. कुठल्याही जात-पात-धर्म-पंथाचा विचार न करता आतापर्यंत सतत लोकांची कामे करीत आलो. गैरप्रकाराचा आरोप नाही. केलेली कामे लोकांसमोर आहेत. शहराचा जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून विविध विकासकामांसाठी पाठपुरावा केला. या सर्व कामांच्या आधारे पुन्हा लोकांसमोर आलो असून भविष्यातही विकासकामांसाठी पाठपुरावा सुरूच राहील, असे विलास मुत्तेमवार यांनी स्पष्ट केले.
