राज्यातील काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असली तरी खरे लक्ष्य दुसऱ्या यादीवरच आहे. त्याचे कारणही तसेच आहे. अशोक चव्हाण आणि सुरेश कलमाडी या दोन वादग्रस्त नेत्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना पक्षाकडमून उमेदवारी दिली जाते का? भ्रष्टाचाराच्या विरोधात पक्षाचे युवराज राहुल गांधी यांनी शंख फुंकले आणि जनलोकपाल विधेयक मंजूर करण्यात आले. भ्रष्टाचार रोखण्याच्या उद्देशाने सरकारने सहा कायदे करण्याची योजना तयार केली. लोकसभेच्या अधिवेशनात ही विधेयके चर्चेला येऊ शकली नाहीत. परिणामी वटहुकूम काढण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. पण वटहुकमावर स्वाक्षरी करण्यास राष्ट्रपती प्रणब मुखर्जी म्हणे तयार झाले नाहीत. तसे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांनी जाहीरपणे सांगितले आहे. काँग्रेस नेतृत्वाने कायम संशयाने बघितल्यानेच राष्ट्रपती भवनात गेल्यावर मुखर्जी जुने हिशेब चुकते करीत असावेत, असेच एकूण चित्र आहे. मात्र काँग्रेस किंवा राहुल गांधी भ्रष्टाचाराच्या विरोधात आहेत हे दाखविण्याचा पक्षाच्या नेत्यांचा प्रयत्न आहे. अशा वेळी अशोक चव्हाण यांना उमेदवारी दिल्यास वेगळा संदेश जाईल, असा काँग्रेसमध्ये मतप्रवाह आहे. नाही तरी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे अशोकरावांना उमेदवारी देण्यास फारसे उत्सुक नाहीत. तिकडे पुण्यात सुरेश कलमाडी उमेदवारी आपल्याच घरात राहिली पाहिजे, यासाठी अडून बसले आहेत. आपल्या पत्नीला उमेदवारी द्यावी, असा कलमाडी यांचा आग्रह आहे. नांदेडमध्येही आपल्याला उमेदवारी मिळणार नसल्यास पत्नीला उमेदवारी द्यावी, अशी भूमिका अशोकरावांची आहे. मेव्हणे नकोत (विद्यमान खासदार भास्करराव खतगावकर) आपल्याला किंवा पत्नीलाच उमेदवारी मिळावी, असा आग्रह आहे. अशोक चव्हाण किंवा कलमाडी हे आपल्या धर्मपत्नीलाच उमेदवारी द्यावी यासाठी अडून बसल्याने काँग्रेस पक्षश्रेष्ठींची गोची झाली आहे. एका नेत्याच्या पत्नीला उमदेवारी दिल्यास दुसऱ्याला कसे डावलायचे ही समस्या पक्षापुढे उभी ठाकली आहे. पत्नीला उमेदवारी मिळणार नसल्यास काँग्रेसला धडा शिकविण्याची सारी योजना कलमाडी यांनी म्हणे तयारी केली आहे. अशोक चव्हाण आणि सुरेश कलमाडी या दोन्ही वादग्रस्त नेत्यांचा धर्मपत्नीसाठी आग्रह असल्याने काँग्रेसपुढे मात्र ‘धर्म’संकट उभे ठाकले आहे!