विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळणे क्रमप्राप्त आहे. जर त्याबाबत वेगळा निर्णय घ्यायचा प्रयत्न झाला तर तो हुकूमशाही वृत्तीचा ठरेल, असा इशारा काँग्रेसने देत सरकारवर दबाव वाढवला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षनेतेपदाबाबत या आठवडय़ात निर्णय अपेक्षित आहे. नियमानुसार विरोधीपक्षनेतेपदासाठी दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला लोकसभेच्या सदस्य संख्येच्या दहा टक्केजागा मिळणे आवश्यक आहे. मात्र काँग्रेसला ४४ जागा मिळाल्याने विरोधी पक्षनेतेपदाबाबत लोकसभा अध्यक्षांनी नियम तपासून निर्णय देऊ असे जाहीर केले आहे. लोकशाहीत विरोधकांची भूमिका महत्त्वाची असते हे ध्यानात घेऊनच काँग्रेसला हे पद मिळायला हवे, अशी अपेक्षा पक्ष प्रवक्ते रणदीप सुजरेवाला यांनी व्यक्त केली आहे.
मध्य प्रदेशच्या मंत्र्यास सर्पदंश
 भोपाळ:मध्य प्रदेशचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री विजय शहा यांना सर्पदंशामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. पहाटे साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला. शहा यांची प्रकृती चांगली असून काळजीचे कारण नाही. शहा यांना जेपी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे राज्याचे मुख्य आरोग्य आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पंकज शुक्ला यांनी स्पष्ट केले.
परीक्षा घोटाळा गाजणार?
भोपाळ:मध्य प्रदेश विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून व्यावसायिक परीक्षा मंडळ घोटाळ्याचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. या प्रकरणी भाजपच्या आमदारांनी बचावात्मक राहू नये असे निर्देश मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आमदारांना दिले आहेत. जनहिताचे सर्व मुद्दे सभागृहात उपस्थित करू असे विरोधी पक्षनेते सत्यदेव कटारे यांनी स्पष्ट केले.

मध्य प्रदेशातील व्यावसायिक मंडळ प्रवेश परीक्षा घोटाळ्याची वेळेत निष्पक्षपणे चौकशी व्हायला हवी. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकाकडून ही चौकशी व्हावी. याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, हीच आमची मागणी आहे.
-अभिषेक मनु सिंघवी, काँग्रेस प्रवक्ते

नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून लगेचच चमत्काराची अपेक्षा करू नका. चांगले दिवस येत आहेत. आता केंद्र आणि राज्य एकत्र काम करत आहेत. गेली काही वर्षे केंद्राचा विचार वेगळा होता. मोदी जेव्हा गोव्यात आले तेव्हा त्यांनी विचारले, कोणत्या मुद्दय़ावर तुम्ही भर द्याल? तेव्हा मी त्यांना मांडवी नदीच्या पुलाचा मुद्दा सांगितला. आर्थिक स्थिती रुळावर आणण्यासाठी काही कठोर उपाययोजना कराव्या लागतील हेदेखील स्पष्ट केले.
-मनोहर पर्रिकर, गोव्याचे मुख्यमंत्री

धर्मनिरपेक्षतेशी संबंधित ए.के.अँटोनी यांचे वक्तव्य हे केरळशी संबंधित होते. पक्षाला त्यातून काही तरी धडा घेता यावा यासाठीच त्यांनी हे वक्तव्य केले. ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत. पक्षाला त्यांचे मार्गदर्शन मोलाचे आहे. यातून वाद निर्माण होण्याचे काहीही कारण नाही
– व्ही.एम.सुधीरन, काँग्रेसचे केरळ प्रदेशाध्यक्ष