लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागले आणि सर्व राज्ये, प्रांतांत एकच धामधूम उडाली. उमेदवार निवडताना ‘जिंकून येण्याची क्षमता’ हा एकच निकष सर्व राजकीय पक्षांनी लावलेला असल्यामुळे दिल्लीही त्यास अपवाद ठरत नाही.
गेली दोन दशके काँग्रेसच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तारूढ असलेली संयुक्त पुरोगामी आघाडी लोकसभा निवडणुकीत काय दिवे लावते, याकडे तमाम राजकीय निरीक्षकांसहित सर्वसामान्य जनता, ‘आम आदमी’ तसेच साऱ्या जगाचेच डोळे लागले आहेत.
काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांनी कायमच दिल्लीवासीयांच्या तोंडाला पाने पुसल्याची तोफ डागत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील ‘आम आदमी पार्टी’ने विधानसभेच्या निवडणुकीत लोकांना नवीन स्वप्ने दाखविली. या स्वप्नांना पाठबळ होते मोफत पाणीपुरवठा आणि वीजबिलातील सवलतीचे. साहजिकच निवडणुकीनंतर सत्तेत येणारच असा समज उराशी बाळगणाऱ्या भाजपला ३२ जागा मिळूनही त्यांचा चांगलाच मुखभंग झाला. काठावरही उत्तीर्ण होण्याची शक्यता वाटत नसणाऱ्या विद्यार्थ्यांस चक्क डिस्टिंक्शन मिळावे, त्याप्रमाणे ‘आम आदमी पार्टी’ला २८ जागा मिळाल्या. परंतु यश मिळाले तरी ते पचविता येत नाही, हे ‘आम आदमी पार्टी’ने नंतर आपल्या वर्तनावरून सिद्ध केले.
लोकसभा निवडणुकीचे वातावरण बघितल्यानंतर ठळकपणे जाणवणारी एक मुख्य बाब म्हणजे या वेळी काँग्रेसने पंतप्रधान मनमोहन सिंग यांना जाणीवपूर्वक बाजूलाच ठेवले असून ते आतापासूनच एक प्रकारे निवृत्तीचे, एकांतवासाचेच जीवन जगत आहेत, असे म्हटले तर वावगे ठरू नये. काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी याही अजून सक्रिय झाल्याचे दिसत नाही. विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसची मदार शीला दीक्षित व सोनिया गांधी यांच्यावरच होती. आता मात्र दीक्षित या केरळच्या राज्यपालपदी नियुक्त झाल्या आहेत आणि पक्षाकडे दुसरा कोणताही लक्षणीय ‘चेहरा’ नसल्यामुळे काँग्रेसची परिणामकारक प्रचारमोहीम कशा प्रकारे राबविण्यात येईल, याची सर्वानाच उत्सुकता आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी सर्वत्र ‘धूम’ माजविणाऱ्या आम आदमी पार्टीच्या तंबूतही सध्या चांगलीच सामसूम जाणवते.
याआधी दोन वेळा सत्तेचा घास हिरावून गेल्यामुळे आणि आताही सर्वाधिक जागा मिळूनही विधानसभेत सत्तारूढ न होता विरोधात बसण्याची वेळ आल्यामुळे सत्तासुंदरीस माळ घालण्यासाठी भाजप चांगलाच उतावळा झाला आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या खांद्यावर पक्षाची सर्व मदार असताना अरुण जेटली, सुषमा स्वराज व अन्य जुने नेते मात्र एक प्रकारे अलिप्तपणे वागत, बोलत असल्याचे सातत्याने जाणवते. त्यामुळे भाजपला यशासाठी काहीशी धावपळ अधिक करावी लागेल. राजधानीतील नोकरशाही सध्या पूर्णपणे थंडावली असून विकासकामांबाबत आधीही ‘उत्साहाचा उल्हास आणि आता त्यातच आचारसंहितेचा फाल्गुनमास’ अशी स्थिती सध्या आहे. निवडणूकपूर्व चाचण्यांच्या निष्कर्षांनुसार, या वेळी दिल्लीत काँग्रेसचे पानिपतच होण्याची दाट चिन्हे आहेत.
त्यामुळे याआधी ‘काँग्रेसका हाथ आम आदमीके साथ’ या घोषणेवर निवडणूक जिंकलेल्या काँग्रेसला याच संतप्त ‘आम आदमी’च्या वैतागाचा कसा आणि किती तडाखा कशा प्रकारे सहन करावा लागेल, याचा फैसला येत्या १० एप्रिल रोजी मतदार करतील यात शंकाच नाही.
लक्षवेधी लढती
चांदनी चौकातून काँग्रेसचे कपिल सिब्बल यांच्या विरोधात भाजपचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन आणि आम आदमी पार्टीचे आशुतोष यांच्यातील लढत आतापासूनच वेधक आणि उत्कंठावर्धक ठरण्याची चिन्हे आहेत. पूर्व दिल्लीत भाजपचे महेश गिरी, काँग्रेसचे संदीप दीक्षित आणि आम आदमी पार्टीच्या तिकिटावर राजमोहन गांधी यांची लढत आहे. ईशान्य दिल्लीत काँग्रेसचे जयप्रकाश अग्रवाल, भाजपचे मनोज तिवारी आणि आम आदमी पार्टीचे आनंद कुमार यांचा सामना रंगेल. नवी दिल्लीतून काँग्रेसचे अजय माकन, भाजपच्या मीनाक्षी लेखी व आम आदमी पार्टीचे आशीष खेतान उतरले आहेत. वायव्य दिल्ली या राखीव मतदारसंघात काँग्रेसच्या कृष्णा तीरथ यांनाच उतरविण्यात आले आहे. भाजपचे उदित राज आणि आम आदमी पार्टीच्या राखी बिर्ला हे तेथून आपले नशीब अजमावीत आहेत. पश्चिम दिल्ली व दक्षिण दिल्ली या मतदारसंघात भाजपने अनुक्रमे प्रवेश वर्मा आणि रमेश विधुरी यांना उतरविले असून अप्रत्यक्षरीत्या जातीय समीकरणांनुसारच उमेदवारांची निवड करण्यावर भाजपने भर दिला आहे. दिल्लीत ओबीसी व दलित मतांची टक्केवारी अनुक्रमे ३७ व २३ अशी असल्यामुळे त्यांच्या मतदानावर अनेक गणिते जुळण्याची वा बिघडण्याचीही शक्यता आहे.
२००९ बलाबल; एकूण जागा ७
काँग्रेस ७