देशातील राजकीय रणसंग्रामाला काही दिवसांत सुरुवात होईल, या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) या देशातील दोन महत्वाच्या राष्ट्रीय पक्षांच्या घमासान युद्धाला अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमीच्या प्रवेशाने आणखी तीव्रता आली आहे. त्यामुळे देशाच्या जाणत्या मतदारासमोर विचारांची कसोटी निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहे. अर्थात स्थानिक पातळीवर विचार करता, योग्य उमेदवाराला मतदान करावे ही मतदाराची भूमिका असावी हे सर्वमान्य आहे. परंतु, राजकारणातील राष्ट्रीय दृष्ट्या उलथापालथ घडवून आणण्याची ताकद ठेवणाऱया देशातील महत्वाच्या मतदार संघांवर टाकलेला प्रकाश झोत..

* सर्वांची नजर वाराणसीवर..
भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना वाराणसी मतदार संघातून उमेदवारी झाल्या नंतर मंदिरांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱया वाराणसीला आता राजकीय रंगही चढला आहे. त्यात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनीही थेट लढतीचे आव्हान देऊन वाराणसी मतदार संघातून मोदींच्या विरोधात स्वत:ची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यात भाजपचे मिशन २७२+ पूर्ण करण्यामागे उत्तरप्रदेशच्या एकूण ८० लोकसभा मतदार संघांचा महत्वपूर्ण वाटा असणार आहे. यामुळे वाराणसीतील नरेंद्र मोदी विरुद्ध अरविंद केजरीवाल रणसंग्रमावर सर्वांची नजर राहणार आहे.

* अमृतसरमधील रणसंग्राम..
भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांना पंजाबच्या अमृतसरमधून जाहीर झालेली उमेदवारी आणि दुसऱया बाजूला काँग्रेसकडून पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यातील थेट लोकसभा लढाईमुळे अमृतसर मतदार संघाचा देशातील चुरशीच्या लढाईतील मतदार संघात समावेश होतो. त्यात अरुण जेटली आपल्या राजकीय वाटचालीत पहिल्यांदा निवडणूक लढविणार असल्याचे जेटलींच्या भवितव्याच्या दृष्टानेही हा मतदारसंघ महत्वाचा आहे.

* चंदीगडमध्ये नेते-अभिनेत्यांची लढत..
लोकसभेच्या राजकीय युद्धात भाजपकडून ज्येष्ठ अभिनेत्री किरण खैर, आम आदमीकडून अभिनेत्री गुल पनाग आणि काँग्रेसकडून माजी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल हे दिग्गज एकमेकांसमोर उभे ठाकल्याने चंदीगड मतदारसंघाची वर्गवारी देशातील महत्वाच्या लढाईत केली जात आहे.      

* रणक्षेत्र कानपूर-
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींचा वाराणसीतील मार्ग मोकळा करून कानपूर मतदार संघातून उमेदवारी स्विकारलेले भाजपचे वाराणसीतील विद्यमान खासदार मुरली मनोहर जोशी आणि काँग्रेसचे केंद्रीय कोळसा मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांतील लढतीमुळे कानपूर मतदार संघाचे राजकीय वजन वाढले आहे. तसेच समादवादी पक्षाकडून मोहन अग्रवाल, ‘आप’कडून डॉ.मेहमूद रेहमानी आणि बहुजन समाज पक्षाकडून मोहम्मद सालेम यांच्यामुळेही कानपूर मतदार संघातील निवडणूक म्हणजे ‘कांटे की टक्कर’ होण्याची दाट शक्यता आहे.  

* दक्षिण मुंबईत राजकीय कन्यांची लढत
उत्तर-मध्य मुंबई मतदार संघ यावेळीच्या लोकसभा निवडणूकीत राजकीय कन्यांच्या लढतीसाठी ओळखला जाणार आहे. महाराष्ट्र भाजपचे कर्तेधर्ते म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय. प्रमोद महाजन यांची कन्या पुनम महाजन, तर दुसऱया बाजूला अभिनेता आणि नेता या दोन्ही भूमिकांसाठी प्रसिद्ध राहिलेले सुनिल दत्त यांची कन्या प्रिया दत्त उत्तर-मध्य मुंबई मतदार संघात एकमेकींसमोर उभ्या ठाकल्या आहेत. दोन्ही उमेदवार आपल्या वडिलांचा राजकीय वारसा जपण्यासाठी आपले नशिब आजमवणार आहेत.

* दिल्लीच्या चांदणी चौकातील घमासान
काँग्रेसचे केंद्रीय मंत्री कपील सिब्बल, दिल्ली भाजपचे प्रमुख हर्षवर्धन आणि ‘आप’चे आशुतोष यांच्यातील राजकीय घमासान दिल्लीतील चांदणी चौकात पाहण्यास मिळणार आहे. मतदार संघातील मुस्लिम समाजाची टक्केवारी अधिक असल्याने येथे भाजपचे हर्षवर्धन यांच्या मतांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच काँग्रेसचे कपील सिब्बल आणि आपचे आशुतोष यांच्यात मुख्यलढत होण्याची चिन्हे आहेत. भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या हर्षवर्धन यांना दिल्लीच्या विधानसभा निवडणूकीत मिळालेल्या यशामुळेही हर्षवर्धन यांनाही चांदणी चौक मतदार संघासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.

* यावेळी ‘नवी दिल्ली’त काहीतरी नवे..
काँग्रेस नेते अजय माकन, भाजपच्या मिनाक्षी लेखी आणि ‘आप’कडून पत्रकार आशिष खेतान यांच्यातील थेट लढतीमुळे नवी दिल्लीत लोकसभेच्या रणसंग्रमाची नवी समीकरणे पाहण्यास मिळणार आहेत.

* पूर्व-दिल्लीत तिरंगी लढत
पूर्व-दिल्ली लोकसभा मतदार संघातील लढत देखील महत्वाची मानली जात आहे. काँग्रेसकडून दोन वेळा खासदार राहिलेले संदिप दीक्षित यांना आपच्या राजमोहन गांधी आणि भाजपच्या महेश गिरींचे आव्हान असणार आहे. सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या महेश गिरींना उमेदवारी देऊन मते खेचण्याचा इरादा भाजपचा आहे. तर आपचे उमेदवार राजमोहन गांधींना देखील विजयाची खात्री आहे.   

* गाझियाबादमध्येही तीक्ष्ण स्पर्धा
माजी लष्करप्रमुख व्ही.के.सिंग यांचा भाजप प्रवेश आणि त्यांना गाझियाबाद मतदार संघातून मिळालेली उमेदवारी तसेच काँग्रेसकडून राज बब्बर आणि ‘आप’कडून शाजिया इल्मी यांच्यामुळे गाझियाबाद मतदार संघावरही सर्वांचे लक्ष असणार आहे.

* पाटलीपुत्रच्या गादीवर कोण विराजमान होणार?
पाटलीपुत्र मतदार संघालाही विशेष महत्व प्राप्त झाले आहे. ‘राजद’चे लालूप्रसाद यादव यांची कन्या मिसा भारती यांना गाझियाबादमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, लालूप्रसाद कन्या मिसा भारती यांची लढत खुद्द आपले काका रामकृपाल यादव यांच्याशी होणार आहे. लालूबंधू रामकृपाल यादव राजदचे खासदार राहिलेले आहेत. बिहारची सध्याची अवस्था बघून आपल्याला अतिशय दुःख होते आहे आणि बिहारमध्ये कामापेक्षा घराण्याला जास्त महत्त्व दिले जात असल्याचे म्हणत रामकृपाल यांनी ‘राजद’ला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपनेही रामकृपाल यांना पाटलीपुत्रमधून उमेदवारी जाहीर केली आणि या मतदार संघाच्या लढतीला चुरशीचे बनविले