शेतकरी चळवळीच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना धडकी भरविणारे ‘स्वाभिमानी’ नेतृत्व राजू शेट्टी आणि साखर कारखानदारांचे पाठबळ लाभलेले कल्लाप्पाण्णा आवाडे या आजी-माजी खासदारांतील लढत देशाचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ऊस पट्टय़ात असलेला भक्कम आधार आणि त्याला भाजप, शिवसेना, रिपाइंची मिळालेली मजबूत ताकद याआधारे शेट्टी यांनी कडवे आव्हान निर्माण केले आहे. शेट्टींविरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादीला मातब्बर उमेदवार न मिळाल्याने अखेर तडजोडीचा पर्याय म्हणून काँग्रेसच्या आवाडे यांना रिंगणात उतरविले आहे. सुरुवातीला शेट्टी यांना ही निवडणूक एकतर्फी होती, पण जात-धर्म, साखर उद्योगाचे राजकारण-अर्थकारण याचा परिपाक म्हणून आवाडे उभे ठाकल्याने निवडणुकीच्या उत्तरार्धात चुरस वाढीला लागली आहे. शेट्टी हे दुसऱ्यांदा ‘शिवारातून संसदेत’ जाणार की हॅट्ट्रिक चुकलेले आवाडे साखरपेरणी करीत दिल्लीकडे कूच करणार याचा अंदाज जाणकारांसह सट्टेबाजारालाही आज येत नाही.
ऊस आंदोलनातून राजू शेट्टी नावाचे वादळी नेतृत्व आकारास आले. शरद जोशी यांच्यापासून प्रेरणा घेत शेट्टी यांनी उसाचा फड आंदोलनांनी पेटवून दिला. परिणामी ऊस दरामध्ये लक्षणीय वाढ होऊन कौलारू घरात राहणाऱ्या ऊस उत्पादक बळीराजाच्या डोईवर आरसीसीच्या इमारती उभ्या राहिल्या. शेट्टी यांनी शेतक ऱ्यांना मजल्यांचे घर मिळवून दिले, तर त्याची उतराई म्हणून शेतक ऱ्यांनी आपल्या मनामध्ये शेट्टी नावाचे घर केले आहे. जिल्हा परिषद, विधानसभा यामार्गे संसदेचे व्दार गाठण्यात शेट्टी यांना ऊस व दुधाचे आंदोलन कारणीभूत ठरले. प्रसंगी डोके फुटले तरी बळीराजाच्या न्यायासाठी लढण्याचा मार्ग त्यांनी सोडला नाही.

लोकसभा निवडणुकीतील बदलता प्रवाह लक्षात घेऊन शेट्टी यांनी महायुतीशी हातमिळवणी करून आपली उमेदवारी बलशाही केली. ‘स्वाभिमानी’ला मानणाऱ्या शेतक ऱ्यांची लाखमोलाची मते आणि भाजप, सेना, रिपाइंचा जनाधार यामुळे शेट्टी यांनी निवडणुकीच्या अगोदर विरोधकांसमोर डोंगराएवढे आव्हान उभे केले. शेट्टी नावाचा झंझावात रोखणे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसमोरील मुख्य समस्या बनली. शेट्टी यांना रोखण्यासाठी शरद पवारांनी धोरणी चालीचा अवलंब केला. त्यासाठी राज्यातील २६-२२ या जागा वाटपसूत्राचा त्यांनी त्याग केला. राष्ट्रवादीचा हक्काचा मतदारसंघ सोडून तो काँग्रेसच्या गळी उतरविण्यात पवारांना यश आले. परिणामी सहकार, शैक्षणिक क्षेत्रात भरभक्कम जाळे विणणारे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांची उमेदवारी अखेरच्या टप्प्यात निश्चित झाली. आवाडे यांना उमेदवारी दिल्याने जैन धर्मीयांच्या दीड-दोन लाख मतांमध्ये फूट पडली. शिवाय या मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी-जनसुराज्य शक्ती अशा सर्व पक्षांच्या सहकारी व खासगी १५ साखर कारखानदार व त्यांच्या समर्थकांना हाताचा प्रचार करण्याचे आदेश दिले. त्यातून या मतदारसंघाच्या लढतीला साखरसम्राट विरुद्ध ऊस उत्पादक शेतक ऱ्यांचा नेता असे आर्थिकदृष्टय़ा असमान स्वरूप प्राप्त झाले असून ही लढत टोकदार बनली आहे.

शेतकऱ्यांच्या कृषीमालाला भाव मिळवून देण्याचा लढा मला लोकसभेच्या लढाईत तारणार आहे. साखर उद्योगातील अलीबाबा व ४० चोर एकत्र आले असले तरी त्यांचा निभाव लागणार नाही. आवाडे यांनी साखर उद्योगाचे कोणते हित केले हे सांगावे. एकाकी झुंज दिली असताना गतवेळी विजय प्राप्त केला होता. आता तर पाच पांडवांचे सामथ्र्य लाभल्याने यशाची चिंता नाही.
राजू शेट्टी, महायुतीचे उमेदवार

ऊस दराचे आंदोलन केल्यामुळे समाजाचे भले होत नाही, तर त्यासाठी विधायक कार्याचे पाठबळ सोबत असावे लागते. आंदोलनाबरोबरच अन्य प्रश्नांकडे खासदाराने लक्ष देणे अपेक्षित असताना त्यामध्ये शेट्टी अपयशी ठरले आहेत. विरोधक वयाचा मुद्दा उपस्थित करीत असले तरी हा शेलारमामा लढाई निश्चितपणे जिंकून दाखवेल.
कल्लाप्पाण्णा आवाडे, काँग्रेस उमेदवार