राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी आता दिल्लीत जाण्याची आवश्यकता असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सुचविल्यानंतर त्यासाठी सर्वप्रथम पुढे आलेले नाव म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ. नाशिक लोकसभा मतदारसंघातून त्यांचा दिल्लीपर्यंतचा प्रवास कोणताही अडथळा न येता पार पडावा म्हणून आता खुद्द शरद पवार यांनाच प्रयत्न करावे लागत आहे. हा मार्ग कठीण असल्याची जाणीव एव्हांना पवार यांनाही झाली असेल. विद्यमान खासदार समीर भुजबळ यांनी आपल्या सहकार्याने केलेल्या कोटय़वधी रूपयांच्या विकास कामांमुळे सहजपणे दिल्ली गाठता येईल हा छगन भुजबळ यांना वाटणारा अंदाज त्यांची पुरती दमछाक करणारा ठरत आहे.
मागील निवडणूक मनसेकडून लढविताना खा. समीर भुजबळ यांना घाम फोडणाऱ्या हेमंत गोडसे यांनी या निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी करत छगन भुजबळ यांच्या नाकीनऊ आणल्याचे चित्र सध्या दिसत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, नाशिकरोड-देवळाली, सिन्नर आणि इगतपुरी हे विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात मनसेचे तीन, शिवसेनेचा एक तर काँग्रेसचे दोन मतदारसंघावर वर्चस्व आहे. विद्यमान खासदार समीर भुजबळ हे पुन्हा एकदा उमेदवारी गृहित धरून एक-दोन वर्षांपासूनच कामाला लागले असताना अचानक पक्षश्रेष्ठींच्या निर्णयामुळे त्यांना काकांसाठी माघार घेणे भाग पडले. मंत्री आणि खासदार अशा काका-पुतण्याची जोडी नाशिक जिल्ह्यात केलेल्या विकास कामांचा डंका सर्वत्र पिटण्यात कमालीची यशस्वी झाली आहे. नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपूल असो, विमानतळ असो किंवा बोट क्लब. नजरेत भरतील अशी कामे करण्यावर या जोडगोळीचा भर राहिला. हे करताना आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसला त्यांनी खिजगणतीतही घेतले नाही. त्याचेच फळ आता त्यांना प्रचारात भोगावे लागत आहे. खरे तर निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेस भवनात झालेल्या पहिल्याच मेळाव्यात भाई जगताप यांच्या उपस्थितीत बहुतेक सर्वच स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादीला धडा शिकविण्याची भाषा केली होती. असंतोषाचा हा वणवा अधिक भडकण्याआधीच राजकारणातील बारकावे कोळून प्यालेले छगन भुजबळ यांनी थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत संयुक्त मेळाव्याचे शिंपण केले. त्यामुळे वरकरणी का होईना काँग्रेसच्या मंडळींना प्रचारात सहभागी असल्याचे दाखवावे लागत आहे. सिन्नरमध्ये काँग्रेसच्या पंचायत समिती सभापतींनी उघडपणे महायुतीचा प्रचार सुरू केल्याने खळबळ उडाली आहे.

नाशिकसह जिल्ह्यात केलेल्या कोटय़वधी रूपयांच्या विकास कामांच्या बळावर मी मतदारांपुढे जात आहे. नाशिक शहरात उभारण्यात आलेला मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपूल, बोट क्लब अशी विकास कामांची अनेक उदाहरणे देता येतील.
छगन भुजबळ (आघाडी)

एक-दोन कामे म्हणजे विकास म्हणता येईल काय ? नाशिककरांचे अनेक प्रश्न अजूनही जैसे थे आहेत. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागातील समस्यांची मला जाण असल्याने आणि सर्वसामान्यांशी नाळ जुळलेली असल्याने जनता मला स्वीकारेल.
हेमंत गोडसे (उमेदवार, महायुती)

नाशिक मतदारसंघाचा चौफेर विकास करण्यासाठी नियोजन आणि अभ्यासाची गरज आहे.  नाशिकमधील गुन्हेगारीला भुजबळांमुळेच  बळ मिळाले आहे. नाशिक मतदारसंघाला एक निष्कंलक आणि अभ्यासू लोकप्रतिनिधी हवा आहे. त्यामुळे नाशिककर माझ्या पाठीशी उभे राहतील.
डॉ. प्रदिप पवार (उमेदवार, मनसे)