केंद्रात होणाऱ्या सत्ताबदलास अनुरूप ठरेल अशा पद्धतीने पंतप्रधानांच्या कार्यालयाचे आणि मंत्रिमंडळ बैठकीच्या कक्षाचे नूतनीकरण करण्यात आले असल्याने या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या कक्षांना नवी झळाळी प्राप्त झाली आहे. अद्ययावत सुखसोयींनी सुसज्ज असलेल्या या कक्षात नवे पंतप्रधान देशाच्या कारभाराची सूत्रे हाती घेणार आहेत.
गेल्या १० वर्षांपासून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग ज्या दालनातून देशाचा कारभार पाहात होते त्या दालनात फ्लॅट-स्क्रीन दूरदर्शन संचही नव्हता, मात्र आता तो बसविण्यात आला आहे. डॉ. सिंग यांनी रंगीत दूरदर्शन संचाचा आग्रह धरला नव्हता, मात्र आता नवा रंगीत संचही बसविण्यात आला आहे. भिंतींवर नवी रंगरंगोटी करण्यात आली असली तरी टेबलावरील चामडय़ाच्या स्तरात बदल करण्यात आलेला नाही.  पंतप्रधानांच्या कार्यालयाची इमारत १०० वर्षे जुनी आहे त्यामुळे तेथे अधिक रंगरंगोटी करण्यात आली नसली तरी कार्यालयात काही नव्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. मात्र कार्यालयातील लाकडी सामान आणि अन्य गोष्टी बदलण्याबाबतचा निर्णय नवे पंतप्रधान घेणार असले तरी पंतप्रधानांचे कार्यालय नीटनेटके आणि त्या पदाला साजेसे असेल असे करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.सदर इमारत १९२०मध्ये बांधण्यात आली असून आतील भिंती दगडांच्या असल्याने त्यावर रंगरंगोटी करण्याची गरज नाही. येथील लाकडी सामान दुर्मीळ असून ते ब्रिटिशांच्या राजवटीपासूनचे आहे. विद्यमान पंतप्रधानांनी ते बदलण्याचा आग्रह धरला नाही, त्यामुळे त्यामध्ये बदल करावयाचा झाल्यास त्याचा निर्णय नवे पंतप्रधान घेणार आहेत. त्यांनी बदलाचा निर्णय घेतल्यास ते बदलण्यात येईल अन्यथा ते पूर्वीप्रमाणेच राहील, असेही अधिकाऱ्याने सांगितले.
पंतप्रधानांच्या कार्यालयात अनेक अभ्यागतांना प्रवेश दिला जात नाही, त्याचप्रमाणे सुरक्षेच्या कारणास्तव तेथे अधिक बांधकाम करण्यासही परवानगी नाही, असेही हा अधिकारी म्हणाला.