महाराष्ट्राच्या राज्यपालपदावर असताना पक्षीय राजकारण न करता, मी या पदाचा सन्मान केला. आता या पदावरून पायउतार झाल्यामुळे उद्यापासून मी काँग्रेससाठी सक्रियपणे काम करणार आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मावळते राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली.
राजमान्य रिकामटेकडे
केंद्रात भाजपप्रणित एनडीएचे सरकार सत्तेत आल्यापासूनचअन्य काँग्रेसनियुक्त राज्यपालांप्रमाणे शंकरनारायण यांचीही उचलबांगडी होण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, त्यांचा कार्यकाळ शिल्लक असल्याने त्यांनी मिझोरममध्ये बदली करून केंद्र सरकारने नवी खेळी केली. बदलीचे आदेश मिळताच शंकरनारायणन यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून राजीनाम्याचा निर्णय घेतला. केरळचे असलेले शंकरनारायणन आता पुन्हा तेथे परतणार असून काँग्रेसचे काम सुरु करणार आहेत.
लोकशाही सर्वोच्च – शंकरनारायणन
लोकशाही ही सर्वोच्च असून कोणतेही पद कायमचे नसते. महाराष्ट्राने मला प्रेम दिले. मी कोणतेही राजकारण न करता या पदाचा सन्मान राखला जाईल, अशा पध्दतीने काम केले. त्याबाबत मी समाधानी आहे. राज्यघटनेचा आदर राखत आपण राजीनामा देत असून केंद्र सरकार सूडाचे राजकारण करीत आहे का, हे तुम्हीच ठरवा, अशी प्रतिक्रिया शंकरनारायणन यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे. कोणतेही  पद किंवा केंद्र सरकारही कायम नसते. राज्यपालपदाची प्रतिष्ठा व सन्मान राखला गेला पाहिजे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
द्वेषप्रवृत्तीचे दुर्दैवी राजकारण माणिकराव ठाकरेंची टीका
राज्यपाल शंकरनारायणन यांची मिझोरामला बदली करुन त्यांना मानसिक त्रास द्यायचा आणि राजीनामा द्यायला भाग पाडायचे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे द्वेषप्रवृत्तीचे दुर्दैवी राजकारण असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली आहे. आणीबाणीची परिस्थिती नसताना बदलीचे आदेश रात्रीअपरात्री काढले जातात. काही राज्यपालांना न्यायालयात जावे लागते. ही लोकशाहीसाठी धोकादायक मानसिकता आहे, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
ही तर प्रशासकीय बाब-फडणवीस
राज्यपालांची बदली ही प्रशासकीय बाब असून मोदी सरकारवर करण्यात येत असलेली विरोधकांची टीका अकारण असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
शंकरनारायणन् यांनी पदावर असतानाही राजकीय ईर्षेतूनच काम केले. असा आरोप भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला.