वडोदरा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी ‘विवाहीत’ असल्याची नोंद केली. यावरून राहुल गांधींसमवेत अनेक काँग्रेसजनांनी मोदींवर टीका केली.
आता काँग्रेस नेते कपील सिब्बल यांनी याआधीच्या निवडणूकीदरम्यानच्या प्रतिज्ञापत्रात मोदींनी विवाहीत असल्याची माहिती लपविल्याच्या कारणावरून निवडणूक आयोगाकडे मोदींविरोधात तक्रार दाखल केल्याचे  सांगितले आहे. त्यामुळे विवाहीत नोंद प्रकरणाने मोदींसमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
कपील सिब्बल म्हणाले की, “नरेंद्र मोदींनी याआधीच्या २००२, २०१२ सालच्या विधानसभा निवडणूकीत प्रतिज्ञापत्रात विवाहीत असल्याची माहीती लपविल्याबद्दल भारतीय दंडाविधान कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे दाखल केली आहे. याआधी मोदींनी जनतेला आपल्या प्रतिज्ञापत्रातून खरी माहिती दिली नाही मात्र, यावेळी वडोदरा मतदार संघातून निवडणूक लढविताना त्यांनी विवाहीत असल्याची नोंद केली आहे. त्यामुळे आजवर मोदींनी खोटी माहिती दिल्याचे समोर आले आहे.” असेही सिब्बल म्हणाले