पक्षांतर्गत विरोधकांच्या कारवायांना कंटाळून मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी राष्ट्रवादीस सोडचिट्ठी दिली असून ते भाजपच्या वाटेवर असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सोमवारी बदलापूरमधील राष्ट्रवादी आणि भाजप नगरसेवकांसोबत ते भाजपच्या वरिष्ठ नेत्याची मुंबईत भेट घेणार आहेत. या बैठकीत त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
 कथोरेंचा ठाणे जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात प्रभाव आहे. अंबरनाथ, मुरबाड, कल्याण, भिवंडी या तालुक्यांत त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांंची संख्या लक्षणीय आहे. ठाणे जिल्ह्य़ात युतीच्या सत्ताकारणात भाजपला कायम शिवसेनेपुढे नमते घ्यावे लागले आहे. त्यामुळे शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपच्या वतीनेही एका मातब्बर नेतृत्वाचा शोध सुरू आहे. बदलापूर पालिकेत यापूर्वी अशाच प्रकारे शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन सत्ता हस्तगत केली होती. ‘बाहेरचा उमेदवार लादू नका’ अशा आशयाचे पत्र शहर भाजपच्या काही नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठींना दिले असले, तरी भाजपचेच काही नगरसेवक कथोरेंचे नेतृत्व स्वीकारण्यास अनुकूल असल्याचे समजते. जिल्हा भाजपचे प्रवक्ते राजन घोरपडे यांनीही आमदार किसन कथोरे भाजपच्या संपर्कात असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला.

पुढील निर्णय कार्यकर्त्यांना विचारूनच
गेली ३४ वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात एकनिष्ठपणे काम केले. विधानसभेच्या दहा वर्षांची कारकीर्दही लक्षणीय ठरली. मतदारसंघात अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले. त्याचे विरोधकांनीही कौतुक केले. मात्र पक्षातील विरोधकांच्या कारवाया थांबल्या नाहीत. त्यामुळे माझ्याबरोबरच सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांवरही अन्याय होतो. त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊनच राष्ट्रवादी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली. पुढील राजकीय भवितव्याचा निर्णय कार्यकर्त्यांना विचारूनच घेऊ, असेही त्यांनी सांगितले.
सूर्यकांताही पक्षाबाहेर
शरद पवार यांच्यापासून ते जितेंद्र आव्हाड यांच्यापर्यंतच्या पक्षनेत्यांवर टीका केल्यानंतर माजी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील आपला १५ वर्षांचा प्रवास थांबविला.पुढील राजकीय निर्णयाची माहिती जाणून घेण्यासाठी तीन-चार दिवस थांबण्याचा सल्ला त्यांनी दिला.