राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव आणि होळी यांचे अनोखे नाते आहे. दरवर्षी पारंपरिक पद्धतीने आणि धूमधडाक्यात ते हा रंगोत्सव साजरा करतात. मात्र यंदा मात्र आचारसंहितेमुळे त्यांच्या होलिकात्सवावर ‘पाणी’ फिरणार आहे. आपल्या कार्यकर्त्यांसोबत आणि सामान्य जनतेसोबत होळी साजरी करताना आचारसंहितेचा भंग होईल आणि उगाचच रंगाचा ‘बेरंग’ होईल, अशी भीती लालूंना वाटत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
‘‘यंदा होळी खेळायला मी मूर्ख नाही. लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झालेली आहे. निवडणूक आयोगाचे प्रत्येकाकडेच लक्ष आहे. मी होळी खेळायचो आणि त्यामुळे आचारसंहितेचा भंग व्हायचा. म्हणून होळी खेळून मला फसायचे नाही,’’ असे लालूंनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले. लालू प्रसाद दरवर्षी त्यांच्या निवासस्थानी आपले कार्यकर्ते आणि जनतेसोबत मोठय़ा उत्साहात होळी साजरी करतात. मात्र यंदा ते होळीच्या दिवशी घरीच आराम करणार असल्याचे समजते.