लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत निर्णायक विजय मिळवल्याबद्दल तिबेटचे आध्यात्मिक गुरू दलाई लामा यांनी नरेंद्र मोदी यांचे शनिवारी अभिनंदन केले. अहिंसेची अबाधित परंपरा लाभलेला भारत हा आशियातील सर्वात मोठी आणि स्थिर लोकशाही असलेला देश आहे. या देशात अनेक धर्म गुण्यागोविंदाने नांदत आहेत आणि इतर देशांनी भारताचा हा आदर्श नक्कीच बाळगायला हवा. याच परंपरेच्या देशाचे नेतृत्व आता तुम्ही करणार आहात. मोदींनी गुजरातमध्ये मुख्यमंत्री म्हणून जो विकास केला, तो विकास त्यांना आता देशात करायचा आहे,’ असे लामा यांनी मोदींना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.  
जनतेने काँग्रेसला निर्दयपणे
शिक्षा केली – भाकप
नवी दिल्ली : सार्वत्रिक निवडणुकीत जनतेने दिलेला कौल भाकपने स्वीकारला असून विश्वासघात करणाऱ्या काँग्रेसला शिक्षा करताना जनतेने दयामाया दाखविली नाही, असे म्हटले आहे. या निवडणुकीत डाव्या पक्षांना मोठा पराभव पत्करावा लागला, या निवडणुकीत पैसा आणि मनुष्यबळ यांचा वारेमाप वापर पाहावयास मिळाला, असे पक्षाच्या मध्यवर्ती समितीने म्हटले आहे. विश्वासघात करणाऱ्या पक्षांना जनता निर्दयपणे धडा शिकविते आणि निवडणुकीचे निकाल हे काँग्रेसच्या गैरकारभाराविरुद्ध जनतेच्या क्रोधाचे प्रतीक आहे, असेही समितीने म्हटले आहे.

‘‘तो’ निर्णय मोदी आणि पक्षाचा’
नवी दिल्ली : नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात आपला समावेश करण्याबाबतचा निर्णय भाजप आणि पक्षाचे नेते नरेंद्र मोदी घेतील, असे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी येथे सांगितले. येडियुरप्पा यांनी शनिवारी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उच्चपदस्थ नेत्यांचीही भेट घेतली.
येडियुरप्पा यांनी भाजपला मिळालेल्या विजयाचे श्रेय मोदी आणि पक्षाच्या नेतृत्वाला दिले. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेस पक्षाच्या कामगिरीवरही टीका केली.
गोगोई लवकरच राजीनामा देणार
गुवाहाटी : पक्षाला आसाममध्ये दारुण पराभव पत्करावा लागला त्याची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी येत्या आठवडय़ात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. मात्र, आपण राजकारण सोडणार नाही आणि पक्षाला यातून बाहेर काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न करू, असे गोगोई यांनी स्पष्ट केले. सलग तीन वेळा मुख्यमंत्रिपद भूषविल्याने उद्धटपणा येतोच आणि तेच पक्षाच्या आणि आपल्या बाबतीत झाले, अशी कबुली त्यांनी दिली.