‘अंधेरा हटेगा, कमल खिलेगा’.. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी जपलेले एक स्वप्न आज साकारले. देशाच्या अलीकडच्या इतिहासात प्रथमच, एकटय़ा भाजपने स्वबळावर बहुमताच्या २७२ जागांच्या जादूई आकडय़ापर्यंत मजल मारली. कट्टर संघस्वयंसेवक असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने प्रथमच एवढी चमकदार कामगिरी बजावली. मतमोजणीचा कल पाहता, एकटय़ा भाजपला देशभरात २८५ जागांवर सहज विजय मिळेल, हे आता स्पष्ट झाले आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेत्रदीपक कामगिरीपुढे काँग्रेससारखा बलाढय़ पक्षदेखील पुरता झाकोळून गेला असून जेमतेम एका बसगाडीत मावतील एवढेच खासदार काँग्रेसच्या गाठीशी शिल्लक राहिले आहेत. भाजपच्या मोदी झंझावातात काँग्रेसचे असंख्य दिग्गज पाचोळ्यासारखे गारद झाले असून भाजप आघाडीतील अनेकांच्या गळ्यात केवळ मोदी कृपेने विजयाची माळ पडली आहे.
निवडणुकीनंतरच्या पाहणीनुसार, भाजपप्रणीत रालोआला सरकार स्थापनेसाठी नव्या मित्रपक्षांची जमवाजमव करावी लागेल, अशी भाकिते अनेक दिग्गजांनी वर्तविली होती. भाजपनेदेखील कालपर्यंत त्या दृष्टीने मोर्चेबांधणीही सुरू केली होती. एक एक खासदाराचा पाठिंबादेखील स्वीकारला जाईल, असे भाजपच्या वतीने मतमोजणीअगोदरच्या शेवटच्या क्षणापर्यंत सांगितले जात होते. मात्र, मतमोजणी सुरू झाली आणि पहिल्या फेरीतच भाजपच्या विजयाचा वारू वेगाने देशभरातील सर्व मतदारसंघांत वावरू लागल्याचे स्पष्ट झाले. मतदानोत्तर चाचण्यांनुसार वर्तविले गेलेले सारे अंदाज साफ पुसले गेले आणि नव्या मित्रांची जमवाजमव करण्याऐवजी, निवडणूकपूर्व आघाडीतील पक्षांचीदेखील सत्तास्थापनेसाठी गरज लागणार नाही, असे भक्कम संख्याबळ भाजपच्या गाठीशी जमा झाले. मतमोजणीतून स्पष्ट होणारा कल पाहता, भाजपप्रणीत रालोआला देशभरातून ३४० हून अधिक जागांवर सहज विजय मिळेल असे स्पष्ट झाले असून, नरेंद्र मोदी यांनी दिलेला काँग्रेसमुक्तीचा नारा काही राज्यांत प्रत्यक्षात आल्याचेही दिसत आहे.
एकटय़ा भाजपकडे आणि निवडणूकपूर्व मित्रपक्षांकडे भक्कम बहुमत असल्यामुळे, आता मतदानानंतर नवे मित्र जोडण्याची भाजपला गरजच भासणार नसून, भाजपच्या वळचणीला येऊन सत्तेची ऊब चाखण्याची स्वप्ने पाहणाऱ्या अनेक लहानमोठय़ा राजकीय पक्षांची आणि दिग्गज नेत्यांची पुरती निराशा झाली आहे. भाजपच्या या प्रचंड विजयामुळे देशात गेल्या काही दशकांपासून सुरू असलेल्या आघाडीच्या सत्ताकारणाचाही अस्त जवळ आल्याचे संकेत मिळत असून, एकपक्षीय सत्ताकारणाचा नवा उदय मोदी यांच्या एकहाती विजयामुळे दृष्टिपथात आल्याचेही मानले जात आहे. सुमारे तीस वर्षांपूर्वी, इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेसला प्रचंड विजय मिळाला होता. तेव्हा जेमतेम चार वर्षांची राजकीय कारकीर्द असलेल्या भाजपला लोकसभा निवडणुकीत केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर रालोआच्या प्रयोगामुळे भाजप सत्तेजवळ पोहोचला, आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने देशावर राज्य केले. तथापि, सोळाव्या लोकसभेसाठी भाजपने मिळविलेला विजय सर्वार्थाने ऐतिहासिक असा ठरला आहे. लोकसभेच्या निवडणुकांचे वारे देशात वाहू लागल्यापासून एकटय़ा मोदी यांनी उभा देश प्रचारसभांनी पिंजून काढला. भाजपच्या या भरघोस विजयाचे सारे श्रेय, तब्बल साडेचारशे जाहीर सभांमधून घराघरात पोहोचलेल्या मोदी यांचेच असल्याने, नरेंद्र मोदी हा यापुढील काळातील भाजपमधील अंतिम शब्द राहणार आहे.
भाजपच्या या निवडणूक मोहिमेत पक्षाची पितृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही महत्त्वाची भूमिका बजावली होती. राष्ट्रीय स्तरापासून बूथ पातळीपऱ्यंत सर्वत्र केलेल्या नियोजनबद्ध आखणीमुळे, संघाचा एकएक कार्यकर्ता त्याच्या क्षेत्रातील तीनशे मतदारांपर्यंत पोहोचेल आणि त्यांची मते निश्चित करेल अशी योजना संघयंत्रणेने आखली होती. या आखणीला अभूतपूर्व यश आल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्या दमाच्या नेतृत्वाला अधिक संधी देण्यावर मोदी यांनी भर दिल्याने, भाजपचे बुजुर्ग नेते लालकृष्ण अडवाणी अजूनही नाराज असल्याचे बोलले जात असले, तरी आता मोदी यांना संघाचा पूर्ण पाठिंबा राहणार असल्याने, अडवाणी यांची भविष्यातील भूमिकादेखील मोदी आणि संघ यांच्या सहमतीनेच निश्चित होईल, असे सूत्रांचे मत आहे. अडवाणी यांनी यापुढे पक्षाच्या मार्गदर्शकाची भूमिका बजावावी, अशी मोदी गटाची अपेक्षा असून संघपरिवारातूनही त्याला पाठिंबा असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे अडवाणी यांना लोकसभाध्यक्षपदाची माळ गळ्यात घालून घ्यावी लागेल, असे सूत्रांचे मत आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे नरेंद्र मोदी यांच्याशी फारसे सलोख्याचे संबंध नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे गृह, संरक्षण, वित्त किंवा परराष्ट्र व्यवहार या चार महत्त्वाच्या खात्यांपैकी एक खाते मिळावे अशी स्वराज यांची अपेक्षा असली तरी त्यांच्यावर कोणती जबाबदारी राहील, तेदेखील अद्याप अस्पष्टच असल्याचे या सूत्रांना वाटते. मोदी मंत्रिमंडळात महत्त्वाचे संभाव्य स्थान असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांना मात्र मोदी लाटेचाही लाभ मिळाला नाही. ते पराभूत झाले असून लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवाचा शिक्का असलेले जेटली हे मोदी मंत्रिमडळातील एकमेव नेते असतील.
भाजपच्या या विजययात्रेला अनेक राज्यांनी अक्षरश: भरभरून प्रतिसाद दिला आहे. उत्तर प्रदेशसारख्या राज्यातील लोकसभेच्या ८० जागांपैकी सत्तर जागा भाजपच्या पारडय़ात पडतील अशी चिन्हे असून हा एक विक्रमच मानला जात आहे. गुजरात, राजस्थान, गोवा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, या राज्यांतही भाजपला भरघोस यश प्राप्त झाले असून काँग्रेसमुक्त भारताचा मोदी यांचा नारा अनेक राज्यांत प्रत्यक्षात आल्याचे दिसू लागले आहे. ५४३ जागा असलेल्या लोकसभेच्या या निवडणुकीत भाजपने ४२८ मतदारसंघांत उमेदवार उभे केले होते. २००९ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला ११६ जागांवर विजय मिळाला होता. या निवडणुकीत त्यामध्ये सव्वाशेहून अधिक जागांची भर पडणार, असे स्पष्ट झाले आहे.

८,४५,४६४ इतकी मते नरेंद्र मोदी यांना वडोदरा मतदारसंघात मिळाली़  त्यांचे प्रतिस्पर्धी आणि काँग्रेसचे सरचिटणीस मधुसूदन मिस्त्री यांना केवळ २,७५,३३६ मते मिळाली़  येथे एकूण मतदान ११.६३ लाख इतके झाले होत़े  
१६ व्या लोकसभेसाठीच्या निवडणुकांमध्ये भाजपने मिळविलेल्या या भव्य विजयामध्ये मोदी यांच्या नेतृत्वाचा तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वाटा किती हा विश्लेषणाचा भाग आह़े मात्र भ्रष्टाचार, ढिसाळ प्रशासन आणि घराणेशाहीविरोधात प्रामुख्याने मतदान झाले, यात शंका नाही.
लालकृष्ण अडवाणी, ज्येष्ठ नेते भाजप

एखाद्या पक्षाने काँग्रेसवर एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर मात करण्याची स्वतंत्र भारतातील ही पहिलीच घटना आह़े  काँग्रेस पक्ष अक्षरश: भूईसपाट झाला आह़े  या विजयाचे श्रेय मी नरेंद्र मोदी यांना देतो. मोदी यांच्यामध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे.
राजनाथ सिंह, अध्यक्ष, भाजप

१८हजार इतक्या मतदारांनी वडोदरा मतदारसंघात ‘नोटा’चा पर्याय वापर केला़
७ दिल्लीतील लोकसभेच्या सर्व ७ जागांवर भाजपने विजय मिळविला़  येथील सर्व ७ विद्यमान खासदार काँग्रेसचे आहेत़
२ गोव्यामधील लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपने जिंकल्या़  तेथे भाजपचा एकच खासदार होता़

नंदूरबार मतदारसंघातून सलग नऊ वेळा खासदारकी मिळविणारे काँग्रेसनेते माणिकराव गावित यांना भाजपच्या उमेदवार डॉ़ हीना गावित यांनी तब्बल १ लाख ६ हजार ९०५ च्या मताधिक्याने धूळ चारली आह़े  त्यामुळे माणिकरावांचा विक्रम हुकला आह़े

भाजपच्या उमेदवार किरण खेर यांनी चंढिगढ मतदारसंघातून ‘आप’च्या उमेदवार गुल पनाग आणि काँग्रेसचे उमेदवार पवनकुमार बन्सल यांचा पराभव केला़  खेर यांना १ लाख ९१ हजार ३६२, तर बन्सल यांना १ लाख २१ हजार ७२० आणि पनाग यांना १ लाख ८ हजार ६७९ मते मिळाली़

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी उत्तर प्रदेशातील लखनऊ मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रा़ रीटा बहुगुणा यांचा दणदणीत पराभव केला़  त्यांनी बहुगुणा यांना तब्बल २ लाख ७१ हजार १८२ च्या मताधिक्याने मात दिली़  बसपाचे नकुल दुबे तर येथे तिसऱ्या स्थानावर फेकले गेल़े

भाजपच्या अमेठीतील उमेदवार स्मृती इराणी यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि ‘आप’चे कुमार विश्वास यांना येथून जोरदार टक्कर दिली़  परंतु, काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघात त्यांना निभाव न लागून अखेर त्यांना १ लाख ७ हजार ९०३ मतांनी पराभूत व्हावे लागल़े

पंजाबमधील अमृतसर मतदारसंघातून पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरणारे भाजपचे उमेदवार आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांना येथील काँग्रेसचे उमेदवार कॅ़ अमरिंदर सिंग यांनी १ लाख २ हजार १०६ च्या मताधिक्याने धूळ चारली़

भाजपने लोकसभेची उमेदवारी नाकारल्यामुळे बंडखोरी करून राजस्थानमधील बारमेर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या जसवंत सिंग यांचा भाजपचे येथील अधिकृत उमेदवार कर्नल सोना राम यांनी ८७ हजार ४६१ मतांनी पराभव केला़

भाजप
    २०१४    २००९
आंध्रप्रदेश     ०३    ०
अरुणाचल प्रदेश    ०१    ००
आसाम     ०७    ०४
बिहार    २२    १२
गोवा    ०२    ०१
गुजरात     २६    १५
हरयाणा     ०७    ००
हिमाचल प्रदेश     ०४    ०३
जम्मू-काश्मीर    ०३    ००
कर्नाटक     १७    १९
केरळ    ००    ००
मध्य प्रदेश     २७    १६
महाराष्ट्र     २३    ०९
मणिपूर    ००    ००
मेघालय    ००    ००
मिझोराम    ००    ००
नागालँड    ००    ००
ओडिशा     ०१    ००
पंजाब     ०२    ०१
राजस्थान       २५    ०४
सिक्कीम     ००    ००
तामिळनाडू     ०१    ००
त्रिपुरा     ००    ००
उत्तर प्रदेश     ७१    १०
पश्चिम बंगाल     ०२    ०१
छत्तीसगड    १०    १०
 झारखंड     १२    ०८
उत्तराखंड     ०५    ००
अंदमान-निकोबार    ०१    ००
चंडीगड    ०१    ००
दादरा नगरहवेली    ०१    ००
दमन-दीव     ०१    ००
दिल्ली    ०७    ००
लक्षद्वीप     ००    ००
पुद्दुचेरी    ००    ००
एकूण     २८२    ११३