सुप्रिया सुळे यांना मतदान न केल्यास पाणीपुरवठा तोडण्याबाबत बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील ग्रामस्थांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या दमदाटीची सीबीआयमार्फ नि:पक्षपाती चौकशी व्हावी व  त्यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी बारामती लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी पत्रकार परिषदेत केली. अजित पवारांची दमदाटी ही जर अदखलपात्र ठरत असेल, तर आम्ही या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊ, असेही ते म्हणाले. जानकर म्हणाले, बारामती हा अजित पवार यांचा मतदारसंघ आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री असल्याने पोलीस यंत्रणा आणि प्रशासनावर त्यांचा प्रचंड दबाव आहे. त्यामुळे त्यांच्यावरील आरोपाची चौकशी व्यवस्थित होऊ शकत नाही, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत व्हावी. अजित पवार यांच्या आवाजाची ती ‘क्लिप’ खोटी किंवा बनावट असेल, तर त्याबाबतही चौकशी करण्यात यावी, चौकशीतून त्याबाबतचे सत्य बाहेर येईल. तो आवाज अजित पवारांचा असल्यास त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी.