अमित देशमुखांच्या ‘समझोता एक्स्प्रेस’ची कसोटी!

काँगेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या लातूर मतदारसंघात मागील वेळी काँग्रेसला कोल्हापूरहून जयवंत आवळे यांना आयात करावे लागले.

काँगेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या लातूर मतदारसंघात मागील वेळी काँग्रेसला कोल्हापूरहून जयवंत आवळे यांना आयात करावे लागले. विलासराव देशमुखांनी प्रतिष्ठा पणाला लावून त्यांना विजयी केले. आता होणाऱ्या निवडणुकीत विलासरावांचे पुत्र आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.
राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार काँग्रेस कार्यकर्त्यांमधून लातूरचा उमेदवार निवडण्याचे निश्चित झाले. केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी लातुरात उमेदवारीसाठी चांगलेच प्रयत्न केले. मात्र, पुन्हा ‘स्थानिक व बाहेरचा’ असा तिढा उद्भवण्याची शक्यता होती. काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोणतीही खळखळ न करता जि. प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे गुरुजी यांना तब्बल ७०० मतांनी विजयी केले. स्वच्छ चारित्र्य, पारदर्शी कारभार व सर्वात मिसळणारे अशी बनसोडे यांची प्रतिमा.
दुसरीकडे भाजपमध्ये उमेदवार निवडीवरूनच तिढा निर्माण झाला होता. गोपीनाथ मुंडे व नितीन गडकरी यांच्या खेचाखेचीत अखेरच्या क्षणी डॉ. सुनील गायकवाड यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी खळखळ करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, आम. सुधाकर भालेराव, टी. पी. कांबळे, सुरेंद्र  घोडजकर यांनी माघार घेतली. निवडणूक रिंगणात एकूण १८ उमेदवार असले तरी प्रमुख लढत काँग्रेस व महायुतीच्या उमेदवारांमध्येच होईल. बसपचे दीपक कांबळे, आपचे दीपरत्न निलंगेकर, समाजवादी पक्षाचे बालाजी कांबळे आदी अन्य उमेदवार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार िशदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या प्रचाराचा प्रारंभ झाला. लातूर मतदारसंघात नांदेडातील लोहा व कंधार हे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. मागील वेळी भाजपला या मतदारसंघातून चांगली आघाडी मिळाली. त्यामुळे काँग्रेसने या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले असून, आमदार अमित देशमुखांनी काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबरच शेकापच्या मंडळींच्याही भेटी घेतल्या. या वेळी काँग्रेसचे बनसोडे निवडून आले, तरच अमित देशमुख यांच्या जिल्हय़ातील नेतृत्वावर शिक्कामोर्तब होईल.
केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यासाठी लातूरचा खासदार असलाच पाहिजे, या जिद्दीने मुंडे-गडकरी गट एकदिलाने काम करतील, अशी तयारी सुरू झाली आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार बाहेरचा होता, म्हणून भाजप उमेदवाराला चांगली मते मिळाली. या वेळी काँग्रेसचा उमेदवार स्थानिक असल्यामुळे मागील वेळेप्रमाणेच हे मतदार भाजपलाच मते देतील, असे गृहीत धरता येणार नाही. गारपीटग्रस्तांच्या समस्या, शहरातील पाणी, कचरा आदी मुद्दे काँग्रेसला अडचणीत आणू शकतात.

सामान्यांच्या विकासासाठी रिंगणात -बनसोडे
सर्वसामान्य कुटुंबात आपला जन्म झाला असल्यामुळे सामान्यांच्या प्रश्नांची आपणास जाणीव आहे. विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वष्रे काँग्रेस पक्षात विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. राज्यात लातूरची जिल्हा परिषद प्रथम आली. सामान्य माणसांचे प्रश्न संसदेत मांडून त्यांची सोडवणूक करण्यासाठी आपण निवडणूक लढवत आहोत.

समस्या निवारणासाठी रिंगणात -गायकवाड
लातूर मतदारसंघातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. तरुणांना रोजगार नाही. कोणता मोठा उद्योग नाही. रेल्वेचे प्रश्न  आहेत. आतापर्यंत केवळ मूठभरांचाच विकास झाला. विकासाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठीच आपण निवडणूक रिंगणात उतरलो आहोत.

सामान्यांच्या न्यायासाठी लढणार -निलंगेकर
लातूर मतदारसंघात गेली अनेक वर्षे काँग्रेस व भाजप या दोन प्रमुख पक्षांचे साटेलोटे असल्याचे चित्र आहे. प्रस्थापितांचेच नेतृत्व कायम राहिल्यामुळे सामान्य माणसांचा आवाज दाबला जातो. हा आवाज संसदेत पोहोचवण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देऊ.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Major contest between congress and sena bjp alliance candidate in latur

ताज्या बातम्या