पंतप्रधान या नात्याने देशाला संबोधून अखेरचे भाषण करताना मावळते पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग शनिवारी अत्यंत भावुक झाले. गेल्या १० वर्षांपासून पंतप्रधान म्हणून जबाबदारी पार पाडताना आपण सर्वोत्तम देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि आपली कारकीर्द हे एक ‘खुले पुस्तक’ आहे, असे डॉ. सिंग म्हणाले.
दूरदर्शनवरून डॉ. सिंग यांचे भाषण शनिवारी प्रसारित करण्यात आले. या निवडणुकीत जनतेने जो कौल दिला त्याचा आदर केला पाहिजे, असे नमूद करून डॉ. सिंग यांनी नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या.
आपल्या कारकिर्दीकडे मागे वळून पाहताना मावळते पंतप्रधान म्हणाले की, भारताने अनेक उद्दिष्टे आणि यश संपादन केले आणि त्याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे, गेल्या एका दशकांत देश अधिक शक्तिशाली झाला आहे. परंतु या देशात विकासाला यापेक्षाही अधिक वाव आहे, असेही ते म्हणाले.
पंतप्रदानपदाची जबाबदारी दहा वर्षांपूर्वी स्वीकारली तेव्हा परिश्रम हेच आपले हत्यार, सत्य हाच दीपस्तंभ आणि प्रत्येक वेळी आपल्याला योग्यच गोष्ट करावयाची आहे ही प्रार्थना अशी त्रिसूत्री मनात ठेवून आपण या क्षेत्रात प्रवेश केला, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज आपल्या पदाचा आणि मंत्रिमंडळाचा राजीनामा राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याकडे सुपूर्द केला. राष्ट्रपती मुखर्जी यांनी राजीनामा स्वीकारला असून नवे सरकार स्थापन होईपर्यंत डॉ. सिंग यांना कारभार पाहण्यास सांगितले आहे. त्यापूर्वी सकाळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकसभा संस्थगित करण्याची शिफारस करण्यात आली.