महाराष्ट्रात आम्हीच ‘आप’चे बाप आहोत असे सांगणाऱ्या मनसेला मुंबईत सहा उमेदवार उभे करता येत नाहीत, यातच राज यांच्या पक्षाची स्थिती स्पष्ट होते. मनसे हे बुडणारे जहाज असून काँग्रेस-राष्ट्रवादीप्रमाणेच मनसे पदाधिकारीही ‘आप’मध्ये येत आहेत, असे ‘आम आदमी पार्टी’चे नेते व लोक सभा उमेदवार मयांक गांधी यांनी सांगितले.
आपने पहिल्या टप्प्यात सोळा उमेदवार उभे केले असून आतापर्यंत राज्यातील लोकसभेच्या ४८ मतदारसंघापैकी ४० ठिकाणी आपच्या उमेदवारांची घोषणा झाली आहे. हे सर्व उमेदवार कोणत्या ना कोणत्या चळवळीशी अथवा सामाजिक कामांशी संबंधित असल्याचे सांगून मयांक गांधी म्हणाले, मनसेने आजपर्यंत केवळ नऊ उमेदवार जाहीर केले असून ज्या मुंबईत पक्षाची स्थापना झाली तेथीलही सर्व उमेदवार त्यांना अद्यापि देता आलेले नाहीत. राज यांना त्यांच्या भाषेत उत्तर देणे ही आमची संस्कृती नाही. परंतु हे बुडणारे जहाज असल्याचे आता लोकांच्याही लक्षात आले आहे. त्यांचे अनेक पदाधिकारी ‘आप’मध्ये येत आहेत यावरूनच ही गोष्ट स्पष्ट होत आहे, अशी टीका मयांक गांधी यांनी केली.
मनसेकडे ठोस विचार नाही की कार्यक्रम नाही. हा केवळ वाजणारा डबा आहे प्रत्यक्षात या डब्यात काहीच नसल्यामुळेच त्यांना उमेदवार सापडत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

रणनीतीसाठी महायुतीची बैठक
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीतील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी शिवसेना-भाजप-रिपाई महायुतीची बैठक मंगळवारी पार पडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी पार पडलेल्या या बैठकीत भाजप नेत्यांनी महायुतीच्या संयुक्त जाहिरनाम्यावरही चर्चा केली.
देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून काँग्रेस विरोधी वातावरणाचा निवडणुकीत फायदा उठविण्यासाठी महायुतीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. निवडणुकीमधील रणनीती यावेळी निश्चित करण्यात आली. तसेच महायुतीच्या जाहिरनाम्यात कोणत्या गोष्टी असाव्यात यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले. वांद्रे येथील ‘मातोश्री’वर पार पडलेल्या या बैठकीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप नेते गोपीनाथ मुंडे, विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

काँग्रेसला निळ्या झेंडय़ाचा अखेर आधार
मुंबई : रामदास आठवले युतीबरोबर तर प्रकाश आंबेडकर यांनी बरोबर येण्याचे टाळल्याने कोणताच रिपब्लिकन पक्ष बरोबर नाही, अशी अडचण काँग्रेसची झाली होती. मात्र प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसला प्रचारात निळा झेंडय़ाचा आधार मिळाला आहे. आतापर्यंत कोणता तरी रिपब्लिकन पक्षाचा गट काँग्रेसबरोबर निवडणुकीत बरोबर असायचा. यंदा मात्र कोणीच बरोबर नसल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता होती. या वेळी कोणीच बरोबर येत नसल्याने राष्ट्रवादीने रिपब्लिकन पक्षाच्या खोब्रागडे गटाची साथ घेतली. कवाडे हे काँग्रेसबरोबर येत असून, उद्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते काँग्रेसला पाठिंबा जाहीर करतील.

मोदींची उद्या वर्ध्यात सभा
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची येत्या गुरुवारी वर्धा येथे जाहीर ‘जनचेतना’ सभा होणार असून ते त्या दिवशी विदर्भात मुक्काम करून गारपीटग्रस्त शेतकरी आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधणार आहेत.

मायावती यांचा २७ मार्चला राज्यात प्रचार दौरा
बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती २७ मार्च व १३ एप्रिल असे दोन दिवस राज्यात निवडणूक प्रचार दौरा करणार आहेत. बसप महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजे ४८ जागा लढविणार आहे. पक्षाने आतापर्यंत २१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उर्वरित उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करण्यात येईल. रिपब्लिकन पक्षांतील गटबाजीमुळे दलित मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

माजी आयपीएस अधिकारी पी. के. जैन रिपाइंत
गृह विभागाचे माजी सचिव आणि अप्पर पोलीस महासंचालक पदाचा राजीनामा देऊन पोलीस दलातून बाहेर पडलेले पी. के. जैन यांनी राजकीय वाटचालाठी रिपब्लिकन पक्षाची निवड केली आहे.
रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या उपस्थितीत जैन यांनी मंगळवारी पक्षात प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाच्या व महायुतीच्या उमेदवारांचा ते प्रचार करणार आहेत.