नरेंद्र मोदी यांच्याशी वैयक्तिक मतभेद नाहीत. परंतु मोदींच्या विचारसरणीला विरोध आहे. ही विचारसरणी देशासाठी घातक आहे. मोदी सत्तेत आल्यास देशाचे मोठे नुकसान होईल, अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. ‘मोदी पंतप्रधान झालेत तर देश उद्ध्वस्त होईल’, या पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यानी दोन महिन्यांपूर्वी केलेल्या विधानाचे जोरदार समर्थन राहुल गांधी यांनी केले. भाजपच्या आक्रमक प्रचाराला ‘इंडिया  शायनिंग’ची उपमा राहुल यांनी दिली. २००४प्रमाणे यंदाही भाजपच्या प्रचाराचा फुगा फुटेल, अशी भविष्यवाणी राहुल यांनी वर्तवली. काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना राहुल गांधी म्हणाले की, मोदींची विचारधारा देशाच्या विरोधात आहे. या विचारधारेचा पराभव करण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करीत आहे. उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या ८० जागा परिणामकारक ठरतील, असेही राहुल गांधी म्हणाले.