समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांच्यावर मायावती यांनी जोरदार हल्ला चढविला. ‘आपल्या दुसऱ्या पत्नीसाठी मुलायम आझमगढमधून उभे राहिले आहेत आणि आपले चिरंजीव प्रतीक यादव यांच्या राजकीय वाटचालीचा मार्ग सुलभ व्हावा यासाठीच त्यांचे हे प्रयत्न असल्याचे त्यांच्या नातेवाईकांमध्ये बोलले जात आहे,’ असे गंभीर आरोप मायावतींनी केले.
उत्तर प्रदेशातील एका प्रचारसभेत मुख्यमंत्री अखिलेश यादव मायावतींना ‘आत्या’ असे म्हणाले. त्यावर प्रतिक्रिया देताना ‘अखिलेश यांना आपला भाचाच काय, आपला धाकटा भाऊ मानणेसुद्धा मला अपमानास्पद वाटते,’ असे मायावती म्हणाल्या. दलित नेत्यांची स्मारके पर्यटनास चालना देतात. त्यातून राज्याला उत्पन्नाचे स्रोत मिळतात. पण अशी स्मारके उभारणे म्हणजे शासकीय पैशांचा अपव्यय असे अखिलेश यांचे मत आहे. त्यांच्याबद्दल आपल्याला काय कणव वाटणार, अशी खरमरीत टीका मायावती यांनी केली.

..तर गुरं राखावी लागली असती!
आज मुलायम आणि अखिलेश यांना समाजात जो मान आहे, त्याचे मूळ कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांसाठी केलेले महनीय कार्य हे आहे आणि त्यांचीच स्मारके उभारण्यावर यादव पिता-पुत्र आक्षेप घेत आहेत. जर बाबासाहेब नसते तर यांना गाई-म्हशीच राखाव्या लागल्या असत्या ना, असा तिरकस सवालही मायावती यांनी केला.